हिंगोली । साईनगर वस्तीतला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा किंवा कळमनुरी नगर परिषदेत अथवा उमरा ग्रामपंचायतीत समाविष्ठ करा या मागणीसाठी साई नगरवासियांनी साई नगरजवळ हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर दोन तास रास्तारोको केला. साईनगर ही वस्ती आहे. येथे 1500 च्या जवळपास लोकसंख्या आहे. ही वसाहत ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेत समाविष्ठ नाही त्यामुळे ही वसाहत मुलभूत सुविधेपासून वंचित आहे.
समस्यांनी ग्रस्त साईनगर वसाहत
येथे अंतर्गत रस्ते, नाल्या, पाणी पथदिवे नाहीत, पक्के रस्ते नाहीत. तसेच नाल्या नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पथदिवे नसल्याने रात्री वसाहतीत अंधार असतो. या वसाहतीतील नागरिकांना कोणतेही शासकीय कागदपत्रे मिळत नाहीत. या वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा अथवा दुसर्या ग्रामपंचायतीत ही वसाहत समाविष्ठ करावा, या मागणीसाठी मंगळवारी रोजी हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत रास्तारोको करण्यात आला. तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी पी.एन.ऋषी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनाच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. या आक्रमक आंदोलनानंतर तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी पी.एन.ऋषी यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडून गावठाण आकारबंध केल्यानंतर अभिलेख वेगळे करण्याची कार्यवाही करण्यात येईल.तसेच येत्या सात दिवसांत यावर निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागणीचे निवेदन साईनगरवासियांनी तहसीलदारांना 30 ऑक्टोबर रोजी दिले होते. निवेदनावर रामराव मुकाडे, भगवान कांबळे, यु.जी. गुजरे, के.पी.इंगळे, डी.डी. वाकडे, ज्योती राठोड, मनोहर गव्हाणे आदींच्या स्वाक्ष-या होत्या.