कळमसरेतील गावकर्‍यांची पाण्यासाठी भटकंती

0

अमळनेर । तालुक्यातील कळमसरेसह परिसरात जानेवारी अखेरपर्यंतच मोठ्या पाणीटंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून अजून पूर्ण उन्हाळा कसा काढायचा ही चिंता लागली असून गुरे मालकांनी गुरे ढोरांना पाणी कुठून पाजायचे असा प्रश्‍न पडला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी कळमसरे येथे डांगरी येथील बोरी नदी वरून पाईप लाईन भारत निर्माण योजनेंतर्गत करून तात्कालीन सरपंच व उपसरपंच यांनी पाणी प्रश्‍न सोडविण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यात पर्जन्याचे प्रमाण कमी असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. गेल्या तीन वर्षांपासून गावात खाजगी बोर अधिग्रहित करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येत होता. गावाची लोकसंख्येचा विचार करता गावात दहा ते बारा दिवसांनी पाण्याचा पुरवठा होत आहे. गावातील खाजगी बोर अधिग्रहीत करून ही गावात टंचाईची समस्यां भेडसावत आहे. त्यामुळे गावात लोक प्रतिनिधी मार्फत पाण्यासाठी विविध योजना राबविणे गरजेचे आहे. जेणेकरून गावातील पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी मिटून पाण्याचा प्रश्‍न सुटेल, त्यासाठी पुढे येत असलेला उन्हाळा लक्षात घेता आतापासूनच योग्य ते नियोजन करून बोर किंवा विहिरी अधिग्रहित करून पाणी प्रश्‍न सोडविण्याची मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.