कळमसरे गावाजवळील झोपडीत पोलिसांची कारवाई

0

शिरपूर: शहर पोलिसांनी कळमसरे गावाजवळ एका झोपडीत 3 मे रोजी छापा टाकून कारवाई केली. कारवाईत 43 हजार 944 रुपये किंमतीच्या विदेशी बिअरचा साठा जप्त करत एकाला अटक केली आहे. कळमसरे गावाच्या पुढे प्रिन्स हॉटेलच्या मागे एका झोपडीच्या आडोशाला भगवानसिंग भिमसिंग सिसोदीया (रा.नगावबारी, देवपुर, धुळे) हा विदेशी दारु बाळगुन तिची चोरटी विक्री करीत असल्याची गोपनिय माहिती शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने त्या ठिकाणी खासगी वाहनाने छापा टाकला. त्यात अवैध विदेशी दारूची विक्री सुरु असल्याचे आढळून आले. त्यांच्या ताब्यातील 43 हजार 944 रुपये किंमतीचे बिअरचे 22 बॉक्स विदेशी बिअरचा साठा जप्त करुन भगवान सिसोदिया याला ताब्यात घेतले. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि चंद्रकात पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण बार्र्‍हे, पो.ना. गणेश सोनवणे, पो.काँ. संदीप रोकडे, महेंद्र सपकाळ, मुजाहिद शेख यांनी केली.