कवठळजवळ रीक्षावर दुचाकी धडकली ; प्रभारी वैद्यकीय अधिकार्‍यासह जिल्हा बँक शिपायाचा मृत्यू

0

शहादा- तालुक्यातील कवठळ गावालगत वळण रस्त्यावर कापसाने भरलेल्या अ‍ॅपे रीक्षा व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला तर रीक्षा पलटी झाल्याने त्यातील दोन जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला. मृतांमध्ये पालिका ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी व जिल्हा बँक शिपायाचा समावेश आहे. शहाद्याहून सोनवद कवठळ मार्गे कहाटूळ येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश मोहन पाटील (54) व धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कहाटूळ येथे सहा महिन्यापूर्वीच शिपाई म्हणून रुजू झालेले प्रताप दामू शिरसाठ (50, रा. वलवाडे ता. शिंदखेडा जिल्हा धुळे ह. मु. स्वामी समर्थ मंदिर समोर, शहादा) हे दोघे डॉ. पाटील यांच्या दुचाकी ( क्रमांक एम एच 39. एच 4732) ने कहाटूळ गावाकडे येत असताना गावाच्या वळण रस्त्यालगत तेथून शहाद्याकडे कापूस भरून जात असलेली अ‍ॅपे रीक्षा (क्रमांक एम.एच.15 सी.के. 4614) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे खाली पडल्याने डोक्याला जबर मार लागला. डॉ.रमेश पाटील यांचा जागेवरच तर प्रताप शिरसाठ यांना रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. अपघात एवढा जबरदस्त होता की, मोटरसायकलचे हेडलाईट व हँडल पूर्ण चक्काचूर झाले आहेत तर रीक्षाला धडक लागताच पुढचे संपूर्ण काच फुटून रीक्षा उलटली. रीरक्षा चालक जगदीश माळी त्यांच्या शेजारी दौलत माळी होते तर रीक्षावर हेमंत माळी हे बसले होते. रीीक्षा पलटी झाल्याने दौलत माळी व हेमंत माळी यांना जबर मार लागला आहे . त्यातील हेमंत माळी यांच्यावर शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दौलत माळी यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात मृत झालेले दोघांना शहादा पालिका ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले.