पुणे : शिरूर तालुक्यातील कवठे येमाईत कवठे – टाकळी हाजी रोड नजीक ढगेमाथ्या जवळील विजय उघडे यांच्या शेतात मुक्कामी असलेल्या शेळ्या-मेंढरांच्या तळावर दि. २४ च्या पहाटे ३ च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत एका शेळीस ठार केले आहे. मेंढपाळ तुकाराम हिलाळ यांनी या घटनेबाबत माहिती दिली. तर या घटनेबाबत वन विभागाशी संपर्क साधला असता वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी सकाळीच घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये मोठीच भीती निर्माण झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार मेंढपाळ तुकाराम हिलाळ व त्यांच्या पत्नी भीमाबाई हे आपली १०० मेंढरे व ११ शेळ्यासह रानोरान फिरून त्यांचा ३ वर्षांपासून सांभाळ करीत आहेत. पहाटे ३ च्या सुमारास ढगे माथ्याजवळील उघडे यांच्या शेतात शेळ्या,बकरांसह वास्तव्यास असताना बिबट्याने एका मोठ्या शेळीवर हल्ला करीत तिला ठार केले. या घटनेने हिलाळ कुटुंब पूर्ण हादरून गेले आहे. घटना घडताच तुकाराम हिलाळ यांनी मोबाईलवरून जवळील इतर शेतकऱ्यांना माहिती देताच बाळू वाफारे,गणेश घोडे,रामा किठे,गणपत गावडे,स्वप्नील घोडे,भाऊ देवकर हे शेतकरी तातडीने मदतीसाठी धावून आले. पहाटे बिबट्याच्या हल्ल्यानंतर जाळी तोडून रानोमाळ सैरावरा झालेली सर्व बकरे जमा करीत त्यांनी सकाळपर्यंत तेथे थांबुन हिलाळ कुटुंबाला धीर दिला.
वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी आमदार पोपटराव गावडे व ग्रामस्थानी केली आहे. तर शासन नियमानुसार योग्य ती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याला नक्कीच दिली जाईल असे आश्वासन शिरूरचे वनाधिकारी तुषार ढमढेरे यांनी दिले आहे.