कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावरील माहितीपटाची निर्मिती करून त्यांच्या कविता संगीतबद्ध कराव्यात
सिनेट सदस्य अमोल मराठे यांची मागणी
शिंदखेडा (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावरील माहितीपटाची (Documentary film) निर्मिती करून त्यांच्या कविता संगीतबद्ध करून सुंदर असा संगीतबद्ध संग्रह (Music album) प्रकाशित करावा अशी मागणी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायूनंदन यांच्याकडे विद्यापीठ विकास मंचच्या वतीने सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी निवेदनाद्वारे केली.
हे देखील वाचा
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावामुळे विद्यापीठाला एक नवीन ओळख निर्माण झाली आहे, बहिणाबाईंनी मनुष्य जीवनाचे सार आपल्या कवितांमधून सांगितले असून साधी अक्षर ओळखही नसणाऱ्या एका स्त्रीचे नाव एखाद्या विद्यापीठाला दिले जाणे म्हणजे हे जगातील एकमेवाद्वितीय असे उदाहरण आहे. बहिणाबाईंनी आपल्या अतिशय साध्या सोप्या बोलीभाषेतून माणसाला साक्षात जीवन जगण्याची कलाच जणू सांगितलेली आहे. कवयित्री बहिणाबाईंचे साहित्य म्हणजे आपणा सर्वांसाठी एक अमूल्य असा ठेवा असून त्याचे जतन, संवर्धन आणि प्रसार करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आलेल्या संकटाशी दोन हात करत जीवनाविषयी सकारात्मक दृष्टीकोन देणाऱ्या अशा या महान कवयित्री बहिणाबाईंच्या जीवनावर माहितीपट निर्माण करून खानदेशकन्या बहिणाबाईंचे साक्षात जीवन दर्शन सर्व समाजाला पुन्हा घडवावे, तसेच कवयित्री बहिणाबाईंनी म्हटलेल्या / गायलेल्या कविता, ज्या – ज्या आज उपलब्ध आहेत, त्या सर्व रचना संगीतबद्ध करून कवितासंग्रह तयार करण्याचा उपक्रम आपल्या विद्यापीठाने हाती घेतल्यास आज सोशल मीडियाच्या युगात कवयित्री बहिणाबाईंचे साहित्य, त्यांच्या सर्व रचना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. शिवाय आपल्या विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाईंचे नाव देण्यामागचा आपला हेतू सुद्धा सार्थकी लागेल असेही निवेदनात म्हटले आहे.
कवयित्री बहिणाबाई यांच्या जीवनावर माहितीपट निर्माण करून त्यांच्या कवितांचा संगीतबद्ध कवितासंग्रह तयार करण्यात यावा अशी मागणी सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी कुलगुरूंची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. त्यावेळी विद्यापीठातील कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला जाईल असे आश्वासन कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायूनंदन यांनी दिले आहे.