कविता जाणीवा समृद्ध करणारे माध्यम

0

द्वारकाई व्याख्यानमालेत कवी विशाल उशिरे, अनंत राऊत यांनी गुंफले प्रथम पुष्प

भुसावळ- कविता ही कमी शब्दात मोठा आशय सांगणारे लेखन व गायन कौशल्य आहे. शिक्षकाला गळा आणि गोडी असली तर ती विद्यार्थ्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेते. कवितेतून ज्या शब्दांची पेरणी होते त्यातून जाणीवा समृद्ध करणारी पिढी आकारास येते. कवितेत दुभंगलेली मने सांधण्याचं सामर्थ्य आहे, अशा भावभावना अकोल्याचे कवी अनंत राऊत व रायगडचे कवी विशाल उशिरे यांनी येथे व्यक्त केल्या. भुसावळातील ‘जय गणेश फाउंडेशन’तर्फे द्वारकाई कालिदास नेमाडे यांच्या आठवणी जपण्यासाठी द्वारकाई फिरती व्याख्यानमाला घेण्यात येते. यंदाचे प्रथम पुष्प भुसावळ हायस्कूलमध्ये गुरुवारी गुंफण्यात आले. त्यात ‘या बालगोपाळा हा कवितेचा मेळा’ हा विषय मांडताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भुसावळ हायस्कूलचे चेअरमन जे.एच.चौधरी होते.

यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे माजी चेअरमन ए.एन.शुक्ला, सातपुडा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वामन पाटील, सचिव बी.जी.सरोदे, मुख्याध्यापक हितेंद्र धांडे, माजी नगराध्यक्ष तथा व्याख्यानमालेचे आयोजक उमेश नेमाडे, कवयित्री रजनी निकाळजे, युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक मगरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक समन्वयक अरुण मांडळकर यांनी केले. सुत्रसंचालन मनीष गुरचळ, आभार गायत्री सरोदे यांनी मानले. वक्त्यांना दोंडाईचा येथील कवयित्री लतिका चौधरी यांची ‘माय माझी सरसोती, संस्काराचं गं भांडार’ आणि चाळीसगावचे कवी मनोहर आंधळे यांची ‘घडायाच्या काट्यावानी चाले झपाझप माय’ या कवितेंची अक्षरचित्रे भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक, ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. ‘फिरती व्याख्यानमाला’ ही संकल्पना अभिनव आहे. त्यातून विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागण्यास नक्कीच मदत होईल, असे गौरवोद्गार वक्त्यांनी या उपक्रमाबाबत बोलताना काढले. यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक अरुण मांडळकर, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे, जय गणेश फाउंडेशनचे सल्लागार गणेश फेगडे यांच्यासह भुसावळ हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

‘जगाला काळीज वाटतो’ कवितेला दाद
अकोल्याचे कवी अनंत राऊत यांनी ‘इतक्याचसाठी नाही त्यांचा आदर मनात, नाही मांडला कुणीच बाप पोथी-पुराणात’ बापाची महती मांडली. ‘रोज थोडा या जिवाचा कोंडमारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे’ ही कविता सादर करून त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. त्यानंतर ‘रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते’ ही कविता सुरबद्धपणे सादर करून डोळ्यात पाणी आणलं. आयुष्य हे फुलासारखं असावं असं म्हटलं जातं. पण जोपर्यंत आयुष्यात संकटे येत नाहीत, तोपर्यंत आयुष्याचा अर्थच माणसाला कळत नाही, हे त्यातून पटवून दिले. ‘कवितेमधून जगाला काळीज वाटतो मी, वरचा समाज शिवतो आतून फाटतो मी’ व ‘मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तू पाणी नाही पाजले’ या कवितांनाही दाद मिळाली.

कवितेतून मांडले माय-बाप
रायगड जिल्ह्यातील खालापूरचे कवी विशाल उशिरे यांनी ‘बाप’ कविता खर्जातील आर्जवात सादर करून बालरसिकांना अंतर्मुख केले. ‘तुझ्या खरबुळ्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही’, या ओळीतून त्यांनी कष्टकरी बाप मांडला. ‘सार्‍या अडचणींचा डोंगर फोडला पण कधीच नाही खचला, बाबा तू नावाच्या पुढे आणि आडनावाच्या आधीच मला दिसला’ या कवितेलाही टाळ्या मिळाल्या. ‘तुझ्या नजरेसमोरच्या पाखराला कुठे नेऊन ठेवलं, बघ ना आई काळजाच्या तुकड्याला कागदाच्या तुकड्याने कुठे आणून ठेवलं’ या कवितेतून त्यांनी आई हा विषय मांडला. ‘पावसा जमलं तर उत्तर दे, वाटलं तर सविस्तर दे नाही तर संक्षिप्त दे’ या कवितेतून पाऊस आणि कृषीजीवन मांडले.

शनिवारी कोटेचा महिला महाविद्यालयात व्याख्यान
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शनिवारी कोटेचा महिला महाविद्यालयात सकाळी 10 वाजता गुंफण्यात येईल. नाशिकचे साहित्यिक प्रमोद अंबडकर हे ‘आनंदयात्री साहित्य आणि कवितेची वारी’ हा विषय मांडतील. व्याख्यनमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय गणेश फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.