दीपनगरात अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत रंगले चाळीसगावचे कवी मनोहर आंधळेंचे काव्यगायन
भुसावळ- सामाजिक चढ-उतार अक्षरबद्ध करण्याची विशाल क्षमता काव्यप्रकारात आहे. कवितेच्या प्रांतात माणुसकीची पेरणी केली जाते. कवितेत संवेदना बोथट झालेलं समाजमन चेतवण्याचं सामर्थ्य आहे, अशा भावभावना चाळीसगावचे कवी मनोहर आंधळे यांनी दीपनगर येथे व्यक्त केल्या. त्यांनी ज्येष्ठ बंधू प्रा.वा.ना. आंधळेंची ‘आई मला जन्म घेऊ दे’ ही कविता सादर करताच विद्यार्थ्यांचे डोळे पाण्याने डबडबले.
पुष्पांजली व्याख्यानमालेचा समारोप
भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे संदीप वसंतराव पाटील यांच्या मातोश्री पुष्पा पाटील यांचे स्मरण करण्यासाठी तीन दिवशीय पुष्पांजली फिरती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. तिच्या समारोपाचे तृतीय पुष्प दीपनगरच्या शारदा माध्यमिक विद्यालयात शनिवारी गुंफण्यात आले. ‘चला दोस्ताांनो साहित्याच्या प्रांतात फिरू या’ हा विषय मांडताना कवी आंधळे बोलत होते. अध्यक्षस्थानी दीपनगरच्या शारदा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आर.एन.गाजरे होते. संचालक मिलिंद गाजरे, जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाचे समन्वयक अरुण मांडळकर, भुसावळच्या नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदीप सोनवणे, जळगाव ग.स.चे तज्ज्ञ संचालक योगेश इंगळे, वेल्हाळ्याचे संतोष सोनवणे, मुख्याध्यापक एल.एस.सपकाळे, रसिक कला मंडळाचे देविदास येवलेकर, नगरसेवक राहुल बोरसे यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन भारती बोरोले, प्रास्ताविक अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील, प्रकल्पप्रमुख संजय भटकर यांनी केले. समन्वयक ज्ञानेश्वर घुले यांनी आभार मानले. शिक्षक प्रदीप सोनवणे यांचे वडील भिकारी शंकर सोनवणे यांच्या स्मरणार्थ हे तृृतीय विचारपुष्प गुंफण्यात आले. यशस्वीतेसाठी वसंतराव पाटील, प्रभाकर नेहते, अमित चौधरी, संदीप सपकाळे, प्रमोद पाटील, प्रा. श्याम दुसाने, सचिन पाटील यांनी परिश्रम घेतले.
लेक कवितेला मिळाली दाद
व्याख्यानात कवी मनोहर आंधळेंनी स्व:लिखित ‘काय धरतरीच्या लेका कर विचार जरासा, कर्जापार्य करू नको जीव वेडापिसा, अशी आहे माझी लेक लाखात एक, ‘तंत्र आणि विज्ञान युगातील आम्ही बालके सारी’ या कविता लयबद्धपणे सादर करून विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. ‘माझ्या गावाचा पाऊस त्याची काय सांगू कथा’ ही कविताही सादर केली. त्यातून पावसाच्या झडीमुळे कसे हाल होतात? हे त्यातून मांडले. त्यानंतर कवी कृष्णाजी निकुंभ यांची ‘घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात’ ही कविताही ताकदीने सादर केली.
माय कविता अनुभवाची शिदोरी
कवी आंधळेंनी त्यांची ‘माय’ कविता अतिशय कातर स्वरात पण लयबद्धपणे सादर केली. त्यातील ‘घडायाच्या काट्यावानी चाले झपाझपा माय, कधी कयेना कामात म्हणे कुठे गेला याय’ या ओळींना रसिकांनी भरभरून दाद दिली. सेनापती बापटांची ‘हा देश माझा’ ही कविता सादर करून आंधळेंनी जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा संदेश विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात रूजवण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ बंधू प्रा. वा. ना. आंधळेंची 40 भाषांत भाषांतरीत झालेली ‘आई मला जन्म घेऊ दे’ ही कविताही ताकदीने सादर केली. ती ऐकून विद्यार्थ्यांचे डोळे पाण्याने डबडबल्याचे जाणवले.
इतरांनाही प्रेरणा देणारा उपक्रम
भुसावळसारख्या शहरात सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे सेवाव्रती तरुण ग्रामीण भागात प्रबोधनमाालेच्या माध्यमातून पोहोचताहेत, हे चित्र सुखावह आहे. प्रियजनांच्या प्रीत्यर्थ वैचारिक उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न इतरांनाही प्रेरणा देणारा आहे, अशी भावना शारदा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आर. एन. गाजरे यांनी व्यक्त केली. सामाजिक उपक्रम राबवणार्या हातांना बळ देऊ, अशी ग्वाही भुसावळ येथील अरुण मांडाळकर, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी दिली.यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.