कवी मनाचा प्रतिध्वनी

0

बहिणाबाई चौधरी , कुसुमाग्रज, नामदेव ढसाळ यांचा साहित्यिक वारसा पुढे नेणारा असा हा कविकट्टा. प्रास्ताविकात देवीदास फुलारी म्हणतात, कविता लिहिण्यापेक्षा कविता जगण्याची मजाच काही वेगळी आहे. कविता, अभंग, गझल, चारोळी, हायकू अशा अनेक काव्यप्रकार यात बंदिस्त आहेत. आपल्या एका गझलेत कवयित्री ज्योती शिंदे म्हणतात,
कैक सार्‍या वेदनांना आज मी हरवून आले,
दुःख आज अंतरीचे आज मी बुडवून आले
यातून त्यांच्या सृजनशीलतेची ओळख होते. कदाचित ही कलाकृती त्यांचा अनुभव असावा.
एक महत्त्वाची गोष्ट कविकट्ट्यातून निदर्शनास आली…प्रतिष्ठित-नवोदित, लहान-मोठा, असे अनेक भेद बाजूला सारून कविमनातील जिव्हाळा जवण्याचा एक यशस्वी प्रयत्न कविकट्ट्याने केला आहे. कवी व रसिक यांच्यातील दरी कमी करण्यात कविकट्टा महत्त्वाची भूमिका बजावतो आहे, हे वेगळे सांगायला नको.

सध्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या ’बेटी बचाव’च्या अभियानाला दुजोरा देत मनाशी चापेकर म्हणतात,
मुलगी असते हृदयामधील हलवा कप्पा,
मुलगी असते हास्य अवांतर सुंदर गप्पा
तसेच प्रा. गजानन सोनोने सांगतात,
तुम्ही खुडू नका कोंब
झाड मरून जाईल
तुम्ही मारू नका भ्रूण
लेक सरून जाईल
अतिशय समर्पक अशी वाक्यरचना आणि काव्यातून प्रबोधन करणे एक गौरवास्पद कृत्य आहे. निसर्गविषयी आवड असणार्‍यान कवयित्री हंसिनी उचित लिहितात, माझ्या गावाच्या पल्ल्याड कसा झालर पाऊस माझ्या जीवाच्या पल्ल्याड कसा झालर पाऊस या कवितांना महाराष्ट्राच्या मातीचा गंध आहे. जेव्हा एखाद्या कवीला मातीचा गंध आवडतो आणि उरात बहिणाबाई भेटीचा हर्ष दाटतो तेव्हा निश्चित समजावे की त्याची काव्यमय वाटचाल सुरू झाली आणि याच वाटचालीचे जीवनगाणे विजया मारोटकर सांगतात-
जगण्याच्या वाटेवर जेव्हा
तुझे हरवून गेले उखाणे
पदर पसरला जिथे तिथे
तयांनी केले किती बहाणे
दुःख, वेदना, भ्रष्टाचार, अन्याय यांच्याविरुद्ध केव्हाही पेटून उठायला कवी सज्ज आहे; कारण माया दामोदर खुणावतात,
मी कशालाच घाबरत नाही
जे आहे ते परमसत्य
जन्म आहे तिथे मानवाचा
तिथे मरण आहे अगत्य
अगदी बरोबरच…! जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य मरण पावणारच हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे विचार कसला करताय? उठा, जागे व्हा व संघर्ष करा. अन्यायाविरुद्ध हेच कवयित्री सुचवतात.
कविकट्टा म्हणजे अनपेक्षितपणे मिळालेलं यशच म्हणावं लागेल. या उत्तुंग यशात दत्त वणजे, ज्योती गायकवाड, प्रा. वंदना-अशोक मगरे यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. आईच प्रेम व बाबांच्या आशीर्वादाशिवाय हे यश शक्यच नव्हते. म्हणून बापाची महती सांगताना कवि अशोक गायकवाड म्हणतात, बाप जगण्याची व्यथा, अनुभवाची कथा
बाप एक कैवारी, संस्कार ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या आयुष्याची पाने उलगडताना वेगवेगळे टप्पे येतात, यात बर्याकचदा सुख-दुःख, मान-अपमान, यश- अपयश अशा संमिश्र भावनांचा सामना करावा लागतो आणि यात खचून न जाता जो पुढे वाटचाल करतो तोच खरा वीर. युवा पिढीला संबोधून
कवयित्री वृषाली मरतोडे कविकत्याद्वारे सांगतात;
जीवनाच्या पहिल्या वळणावर
लागली मला ठेच
अजून आले नाही अर्ध्यावर
माझे लक्ष आहे पुढेच
विषय वेगळा पारन्तु आशय तोच. जगाच्या पोशिंद्याला कवयित्री ज्योती गायकवाड हाक देतात,
मी अजून जिंकलो नाही
शर्यत अजून संपली नाही
एवढं एकदा सांगून बघ
स्वतःसाठी जगून बघ
उत्कृष्ट गझलकार अरविंद सागर यांनी चक्क व्यथेलाच आरोळी ठोकली,
एवढा नाही व्यथे अवतार माझा
जीव का करते उगी बेजार माझा
मनातील सगळ्या भावनांचा संगम म्हणजे कविकट्टा. कविकट्ट्यावर जमणार्यांयना कट्टेकरी म्हणतात. हवं ते बोलण्याची मुभा इथल्या प्रत्येकाला असते. ही अशी
जागा आहे जेथे वयाचे, वेळेचे, विषयाचे असे कुठलेच बंधन नसते. विचार आणि संस्कृतीचे आदान -प्रदान करण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कट्टा. कविता सुचवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो तो हा कट्टा.
वावरत असते तरुणाई
अनेक रंग मिसळून मिळतो
कट्ट्याला अनोखा रंग
कोणतीही भाषा टिकणे व तिचा विकास होणे म्हणजे काय? तर संभाषण, लेखन व वाचन या तिन्ही गोष्टींचे क्षेत्र अत्यंत विस्तृत, सखोल व व्यापक होत जाणे. मराठी भाषा सक्षम व बलशाली होण्यास हातभार लावला आहे तो या कविकट्ट्याने.
मराठीविषयी बोलताना आमचे गुरुवर्य साबीर सोलापुरी म्हणतात,
मराठी खरी आपली लाज आहे,
हिच्या वैभवाचा इथे ताज आहे
खरोखरंच मायबोलीची प्रतिष्ठाच नमूद केली आहे इथे! काव्यसंग्रहात अनेक सामाजिक प्रश्नांच्या छटाही आहेत. ‘श्रद्धा’ ही मानवी जीवनातील एक अमूल्य ठेव आहे; पण कोणत्याही श्रद्धेचा अतिरेक हा शेवटी अंधश्रद्धेत परावर्तीत होऊन समाजाला हानिकारक ठरतो. यावर परखड मत मांडले आहे ते कवी राजेंद्र वाघ यांनी ’लोकशाहीच्या देशात’ या कवितेतून कित्येकदा कविमनाला आशयाची एक वाट खुणावत असते आणि त्यातून सामाजिक कवी, निसर्ग कवी, गझलकर, विद्रोही कवी, अशी एक प्रतिमा तयार होत असते. परंतु, कविकट्टा याला अपवाद आहे. कविमनाचा प्रतिध्वनी म्हणजे हा कविकट्टा. महाराष्ट्रातील साहित्यिकांचा हक्काचा विचारमंच म्हणजे कविकट्टा!

-उन्मेष तायडे, पुणे
7507455564