कष्टकरी कामगार पंचायतीचा महापालिकेवर मोर्चा

0
पिंपरी चिंचवड : शहरातील दैनंदिन साफसफाई करणार्‍या कामगारांना किमान वेतन मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. कामगार भवन पासून काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो सफाई कामगारांसह कष्टकरी कामगार पंचायतीचे कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, संदीपान झोंबाडे, धर्मराज जगताप, सविता लोंढे, वंदना साळवे, मंगल जाधव, आशा लगाडे, सरला आहिरे यांच्यासह सफाई कामगार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करा…
आरोग्य विभागातील ठेकेदार सफाई कामगारांना किमान वेतन देत नाहीत. तसेच ठेकेदाराकडून कोणत्याही नियम व अटींचे पालन होत नाही. दि. 1 जानेवारीपासून ते आजपर्यंत काही ठेकेदार सफाई कामगारांसोबत बँकेत जावून त्यांच्या स्लिप भरुन घेतात. त्यांच्या हातामध्ये 7500 ते 9000/- एवढे वेतन टेकवत आहेत. या प्रकाराबाबत कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने सतत आंदोलने, निवेदने देवुनही प्रशासन या प्रकाराकडे डोळेझाक करीत आहे. कामगारांचे पैसे लाटणार्‍या ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या आहेत मोर्चेकर्‍यांच्या मागण्या…
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कामगारांना किमान वेतन त्यांच्या बँक खात्यात देण्यात यावे, कामगारांनी गणवेश न घातल्यास किंवा गैरहजर राहिल्यास ठेकेदाराकडून दंड आकारण्यात येतो. तो दंड करारनामा शर्ती व अटीनुसार घेण्यात यावा. 16 मार्च 2011 ते 15 मार्च 2015 अखेर मानधनावर काम केलेल्या कालावधीतील ई.एस.आय., पी. एफ. व किमान वेतन यातील फरक देण्यात यावा, कंत्राटी आरोग्य विभागातील दैनंदिन साफसफाई करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना वयाच्या 60 व्या वर्षी सेवानिवृत्ती वेतन लागू करावे, आरोग्य विभागामध्ये काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना घरकुल मिळण्यासाठी प्राधान्य द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या.