कसोटी सामन्यात नाणेफेकीची पद्धत कायम राहणार

0

मुंबई :- कसोटी क्रिकेटमधील सामन्याच्या प्रारंभापूर्वी नाणेफेकीची पारंपरिक पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीने हा निर्णय घेतला आहे. समितीने म्हटले आहे की, नाणेफेक हा खेळाचा अविभाज्य भाग असल्याने तो कायम राहील. या विषयावर प्रदीर्घ काळापासून चर्चा सुरू असल्याने समितीच्या निर्णयाकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले होते.

कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंच्या कौशल्याचा कस लागतो. याशिवाय त्यांच्या संयमाचीदेखील परीक्षा पाहिली जाते. अनेकदा मायदेशात खेळणारा संघ त्यांना अनुकूल अशी खेळपट्टी तयार करुन घेतो. खेळाडूंच्या अयोग्य वर्तनाबाबत मात्र कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचा ठराव या समितीने केला आहे. या खेळाची संस्कृती तसेच दोन्ही प्रतिस्पर्धी संघांनी एकमेकांप्रती आदरभाव कायम राखून खेळण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच चेंडू फेरफार प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याचाही ठराव या बैठकीत करण्यात आला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघाला फायदा होऊ नये, यासाठी नाणेफेकीची प्रथा बंद करण्याबाबत मात्र या समितीच्या सदस्यांनी नकार दर्शवला.नाणेफेक न करता पाहुण्या संघाला फलंदाजी वा क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा अधिकार द्यावा, याबाबत चर्चा झाली. मात्र कसोटी क्रिकेटचा तो एक अविभाज्य भाग असल्याने ही प्रथा कायम राखण्यावर एकमत झाले. या समितीमध्ये माईक गॅटिंग, महेला जयवर्धने, डेव्हिड बून व न्यूझीलंडचे प्रशिक्षक माइक हेसन या माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.