कहाणी कपडे विकणार्‍या बापाची अन् विश्‍वचषक विजेत्या कर्णधाराची

0

मुंबई । घरची परिस्थिती हलाखीची, आईचे छत्र वयाच्या चौथ्या वर्षी हरपलेले, वडिलांचा कपड्याचा व्यवसाय, सुरतवरुन कपडे विकत आणायचे आणि ठाणे, मुंबई परिसरात विकायचे, अशाही परिस्थितीत विरारच्या चाळीत त्याने एका ध्येयवेड्या स्वप्नाचा ध्यास घेतला. प्रतिकूल परिस्थितीत संकटांवर मात करत त्याने ते प्रत्यक्षात साकारले. ही कहाणी आहे, विश्‍वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार ठरलेल्या पृथ्वी शॉच्या जिद्दीची, बाप-लेकांनी पाहिलेल्या जग जिंकणार्‍या स्वप्नांची. पंकज शॉ पृथ्वीचे वडील. कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय करायचे. सुरतवरुन कपडे विकत आणायचे आणि ठाणे, मुंबई परिसरात विकायचे. आपल्या मुलाच्या क्रिकेटप्रेमासाठी त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. वयाच्या 5 व्या वर्षापासून पृथ्वीला वांद्रे येथील मैदानावर क्रिकेट प्रशिक्षणासाठी ते घेवून जात असत. विरारवरुन दररोज ट्रेनमधून मुंबईला येणे सोपे नव्हते. छोटा पाच वर्षांचा पृथ्वी भली मोठी साहित्याची बॅग घेऊन प्रचंड गर्दी असलेल्या ट्रेनमधून प्रवास करायचा. पृथ्वीच्या संघर्षाची कहाणी कोणीतरी आमदार संजय पोतनीस यांच्या कानावर घातली. त्यांनी कलिना सांताक्रूझ येथे शिवसेना शाखेच्या समोर पोतनीस यांनी त्याला एक घर मिळवून दिले. लोकलचा प्रवास थांबला आणि त्याला क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करता आले.

प्रवासात पृथ्वीला साथ मिळाली व्ही. के. फाऊंडेशनचे अध्यक्ष विनय खोत यांची. एअर इंडियाच्या मैदानावर सराव करणार्‍या पृथ्वीच्या खेळाची चमक त्यांना दिसली. वयाच्या 10 व्या वर्षी सुरेख फलंदाजी करणार्‍या पृथ्वीला खोत यांनी आधार दिला. क्रिकेट साहित्य, प्रवास, आर्थिक मदत आणि आता जुहू येथील घरात स्थिरावण्यासाठी मदत करणे, असे सर्व काही विनय यांनी पृथ्वीला मिळवून दिले आहे.

पृथ्वीचे क्रिकेट तंत्र चांगले असले, तरी तो शारीरिक तंदुरुस्त वाटत नव्हता. मोठ्या आणि दीर्घ पल्ल्याच्या खेळीकरता तंदुरुस्ती आणि आहारही तितकाच महत्वाचा. ही गरज हेरुन विनय यांनी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याच्या अद्ययावत प्रो स्पोर्ट्स जिममध्ये त्याला प्रवेश मिळवून दिला. पृथ्वीने हॅरिस आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत केलेल्या 546 धावांच्या अप्रतिम खेळीनंतर पृथ्वी प्रकाशझोतात आला. या खेळीमुळे मुंबई क्रिकेट जगताचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले अन् तो मुंबई रणजी संघाचा आधारस्तंभ ठरला.

आपल्या कामगिरीवर पृथ्वी विश्‍वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार ठरला. पृथ्वीला लवकर भारतीय संघात स्थान मिळेल, असा विश्‍वास विनय खोत यांना वाटतो. पृथ्वीला क्रिकेटची देवदत्त देणगी लाभली आहे. त्याला फार शिकवण्याची गरज भासत नाही. आईविना असलेल्या या लेकरावर आम्ही मायेचे छत्र धरले आणि शिस्त हवी म्हणून मी, माझी पत्नी आणि मुलगा या सर्वांनी मिळून त्याची काळजी घेतली, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी व्यक्त केली. मी सुप्रीमो क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ही स्पर्धा बघायची होती, म्हणून आम्ही वांद्रे एमआयजी येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते. तेथे नेटमध्ये पृथ्वी सराव करत होता. सरळ बॅटने खेळणार्‍या पृथ्वीचा फलंदाजी पाहून प्रभावित झालो. तेथे उभ्या असलेल्या त्याचे वडील पंकज शॉ यांना भेटलो. त्यांना वाकोला कलिना येथे घर मिळवून दिल्याने सरावाला त्याला वेळ मिळाला. पृथ्वी खूप मोठा होईल, असे पोतनीस यांनी सांगितले.