काँग्रेसकडून साखर वाटून इंधन दरवाढीचा निषेध

0

धुळे । गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणार्‍या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी शनिवारी काँग्रेस रस्त्यावर उतरली. शहरातील श्रीराम पेट्रोल पंपावर वाहनधारकांना साखर वाटून या इंधन दरवाढीचा आणि पर्यायाने सरकारचा धिक्कार करण्यात आला. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सहन करावी लागत आहे. पेट्रोलने प्रती लिटर 85 रूपये तर डिझेलने प्रती लिटर 72 रूपयांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित हुकले आहे. कर्नाटक निवडणूक सुरु असतांना 24 एप्रिल ते 13 मे दरम्यान तब्बल 20 दिवस सरकारने तेल कंपन्यावंर दबाव टाकून पेट्रोल व डिझेलचे दर वाढू दिले नव्हते. मात्र निवडणूक संपताच आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सरकारच्या या संधीसाधूपणाचा काँगे्रस निषेध करीत असल्याचे या पत्रकात नमूद केले आहे.

साखर आयातीच्या प्रश्‍नाकडेही वेधले लक्ष
पेट्रोलपंपावरील वाहनधारकांना सरकारने पाककडून आयात केलेली साखर वाटत असल्याचे म्हणत काँगे्रसने साखर आयातीच्या मुद्द्यावरही सरकारला घेरले आहे. सीमेपलिकडून गोळीबार करीत पाक शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असतांना त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकार त्यांच्याकडून साखर आयात करीत आहे. सरकारच्या या अनास्थेमुळेच महागाई वाढत असून ‘महेंगाई के विरोधमे, काँगे्रस मैदान मे’, असा नारा देत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात युवक काँगे्रसचा पुढाकार असला तरी महिला आघाडीनेही त्यांना साथ दिली.

यांनी घेतला आंदोलनात सहभाग
आंदोलनात निलेश काटे, राजीव पाटील, गायत्री जयस्वाल, प्रभा परदेशी, सतिष रवंदळे, आलोक रघुवंशी, बानूबाई शिरसाठ, रफिक शाह, इम्तियाज पठाण, योगेश विभूते, संगिता देसले, सुरेखा बडगुजर, नाजनीन शेख, तौसिफ खाटीक, महेश कालेवार, सरवर अन्सारी, राजु कर्पे, मोहसीन तांबोळी, शोएब अन्सारी, रिदवान अन्सारी आदी सहभागी झाले होते.