पिंपरी चिंचवड : केंद्र सरकार ‘सीबीआय’च्या कामकाजात हस्तक्षेप करून दबाव वापरत असल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने आज शुक्रवारी आकुर्डीतील सीबीआय-एसीबीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
देशभरातील ‘सीबीआय’च्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने आज निदर्शने करण्यात येत आहेत. आकुर्डीतील सीबीआय-एसीबीच्या (१० जिल्हे कार्यक्षेत्र) कार्यालयासमोर युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहराध्यक्ष सचिन साठे, महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सरचिटणीस सजी वर्की, मयूर जयस्वाल, माजी महिला प्रदेशध्यक्षा श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, प्रवक्ते गौरव चौधरी, शहाबुद्दीन शेख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या वेळी सत्यजित तांबे म्हणाले, ‘सीबीआयचे संचालक आलोक वर्मा राफेलमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करणार होते. त्यामुळे आपली चोरी उघड होईल याची पंतप्रधान मोदी यांना भीती होती. त्यांनी अधिकार नसताना मध्यरात्री वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. सीबीआय, रॉ, आयबीआय अशा संस्था संपविण्याचे काम मोदी सरकार करत आहे. सीबीआयच्या संचालकाला काढायचे असेल तर न्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते निर्णय घेत असतात. परंतु, मोदी यांनी कोणालाही विश्वाससात न घेता हुकूमशाही पध्दतीने वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. असे तांबे म्हणाले.
सचिन साठे म्हणाले, ‘देशाच्या इतिहास पहिल्यांदाच मोदी सरकारच्या राजवटीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माध्यमांसमोर आले. सरकार न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता स्वायत्तता संस्था असलेल्या सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप केला आहे. मोदी सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे’ असे साठे म्हणाले.