काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदमांना विधानसभेत श्रद्धांजली

0

विधानसभेत उलगडल्या आठवणी; विधानसभेचे कामकाज केले स्थगित

मुंबई :- राज्याच्या राजकारणातील एक हजरजबाबी व दिलखुलास व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. या प्रस्तावादरम्यान विधानसभेतील सदस्यांनी पतंगराव कदम यांच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकत त्यांना श्रद्धांजली वाहिली. याखेरीज कुठलेही कामकाज विधानसभेत झाले नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, जयंत पाटील, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पतंगराव कदम यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करत त्यांच्या काही विशेष आठवणींना यावेळी उजाळा दिला. त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण केल्‍यानंतर विधानसभेचे दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले.

सर्वसामान्यातून तयार झालेले असामान्य नेतृत्‍व-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गेल्‍या चार वर्षांत सांगली जिल्‍हयातील आर.आर.पाटील आणि आता पतंगराव कदम असे दोन उमदे नेते काळाने आपल्‍यापासून हिरावून नेले.विलासराव देशमुख,गोपीनाथ मुंडे,आर.आर.पाटील,वसंत डावखरे आणि पतंगराव कदम हे जमिनीपासून अस्‍मानापर्यंत स्‍वतःच्या कर्तुत्‍वावर झालेले नेतृत्‍व होते.हे सर्वजण आपल्‍यातून निघून गेले हा महाराष्‍ट्राला एक प्रकारचा शाप आहे काय असाच प्रश्न मनात येतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले. पतंगराव कदम आणि माझे वडिल हे दोघे चांगले मित्र असल्‍याने आमचे कौटुंबिक संबंध असल्‍याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले,पतंगराव हे अजातशत्रू व्यक्‍तीमत्‍व होते.कितीही कठिण प्रसंग असो.त्‍यांना कधीही तणावाखाली पाहिले नाही.केवळ १५ रूपये खिशात असताना त्‍यांनी भारती विदयापीठाचे साम्राज्‍य उभे केले.विरोधी पक्षांतही त्‍यांचे जिव्हाळयाचे संबंध होते.कोणी अडचणीचा प्रश्न विचारायला लागला कि प्रेमाने ते अरे बस रे म्‍हणायचे.समोरचाही त्‍यांचा अधिकार मान्य करून बसायचा.कोणी काही आश्वासन मागितले की विचार करायचे नाहीत तात्‍काळ देउन टाकायचे.काँग्रेस काळात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली की त्‍यांचे नाव सातत्‍याने पुढे असायचे.पण नंबर लागला नाही तरी ते कधी नाराज झाले नाहीत.मी विरोधी पक्षात होतो तेव्हा कधी मतदारसंघातील काम घेउन गेलो आणि रिक्‍त हाताने आलो असे कधीच झाले नाही असेही मुख्यमंत्री म्‍हणाले.

पितृतुल्‍य व्यक्‍तीमत्‍व गमावले: राधाकृष्‍ण विखे-पाटील
पतंगराव कदमांचा आमच्या कुटुंबाशी अतिशय घनिष्‍ट संबंध असल्‍याचे सांगून विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे-पाटील म्‍हणाले,माझया वडिलांचे ते निकटचे सहकारी होते.त्‍यांचे मार्गदर्शन मला सतत मिळायचे.यामुळे समाजकारणात आणि राजकारणात आज मी जो काही उभा आहे त्‍यात पतंगरावांचा सिंहाचा वाटा आहे.ते स्‍वतः कमवा आणि शिका योजनेतून शिकले.आपल्‍या कर्तुत्‍वाने त्‍यांनी शून्यातून विश्व निर्माण केले.भारती विदयापीठाचा विस्‍तार आता केवळ देशात नाही तर परदेशात झाला आहे.पदावर असल्‍याचा त्‍यांनी कधी गर्व केला नाही.जनतेच्या हिताच्या कामासाठी कागद घेउन स्‍वतः ते अधिका-यांकडे जायचे आणि सही घेउन यायचे.मंत्री म्‍हणून पतंगराव उत्‍तर दयायला उभे राहिले की विरोधकांच्या सर्व प्रश्नांचे समाधान व्हायचे.सगळयांनीच त्‍यांचा कायम आदर ठेवला.तो अधिकार त्‍यांनी त्‍यांच्या कर्तुत्‍वाने मिळविला होता.त्‍यांच्या अंत्‍यसंस्‍काराला गेलो असताना तिथे एक फलक लावला होता, त्‍यावर लिहिले होते ‘आमचा देव देवाने चोरला’ असे सांगताना राधाकृष्‍ण विखे-पाटील अतिशय भावूक झाले, त्‍यांचा कंठ दाटून आला होता.

अजातशत्रू व्यक्‍तीमत्‍व-अजित पवार
पतंगरावांचे व्यक्‍तीमत्‍व अजातशत्रू होते असे सांगून अजित पवार म्‍हणाले,भान ठेवून योजना आखणारा आणि बेभान होउन योजना राबविणारा माणूस असेच त्‍यांच्याबाबत बोलावे लागेल.पुणे जिल्‍हयात ब्रिटिशकालापासून शंभर-दीडशे मोठमोठया शिक्षणसंस्‍था आहेत.मात्र त्‍या पुण्यात सोनसळसारख्या गावातून येउन वयाच्या केवळ १९ व्या वर्षी त्‍यांनी भारतीविदयापीठाची स्‍थापना केली.भारती विदयापीठ आता केवळ महाराष्‍ट्र आणि देशातच नाही तर सातासमुद्रापार पोहोचले आहे.सर्व वयोगटातील व्यक्‍तींशी त्‍यांचे चांगले जमायचे.वरिष्‍ठातल्‍या वरिष्‍ठ अधिका-यांना ते अरेतुरेतच बोलायचे.पण त्‍याचा कधी कोणाला राग आला नाही.मंत्री म्‍हणून बोलताना कधी त्‍यांनी हातात माहितीचा कागद घेतला नाही.विरोधकांना टोले जरूर लगावले पण कोणाच्या मनाला दुखावेल असे कधी ते बोलले नाहीत.कमरेखालचे वारही त्‍यांनी कधी केले नाहीत.राजकारणात विरोधकांशी दोन हात करणारा पण तरीही त्‍यांच्याशी मैत्रीचे संबंध टिकविणारा असा हा नेता होता.त्‍यांच्या मतदारसंघाच्या प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे.किंबहुना हा भाग राष्‍ट्रवादीचा बालेकिल्‍लाच आहे.पण अशाही परिस्‍थितीत त्‍यांनी तिथे काँग्रेस टिकविण्याचे काम केले.आताही ते बोलत होते अजित ही निवडणूक दोन्ही काँग्रेसनी एकत्ररित्‍या लढविली पाहिजे.विलासराव देशमुख,गोपीनाथ मुंडे,आर.आर.पाटील आणि पतंगराव या चौघांनाही कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती.ते आपल्‍या कर्तुत्‍वाने पुढे आले असेही अजित पवार म्‍हणाले.

मोठया मनाचा माणूस-पृथ्‍वीराज चव्हाण
काँग्रेस काळात महाराष्‍ट्रात नेतृत्‍वबदलाची चर्चा सुरू झाली की कायम पतंगरावांचे नाव पुढे असायचे.पण काही कारणांनी त्‍यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही.२०१० साली जेव्हा अचानकपणे माझयाकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली तेव्हाही त्‍यांचे नाव चर्चेत होते.मात्र मी शपथ घेतल्‍यानंतर मंत्रीमंडळातील ज्‍येष्‍ठ सहकारी म्‍हणून त्‍यांनी मला कायम साथ दिली.ती अगदी माझया मुख्यमंत्रीपदाच्या अखेरच्या दिवसापर्यंत असे पृथ्‍वीराज चव्हाण म्‍हणाले.माझया कार्यकाळात त्‍यांनी मदत व पुनर्वसनमंत्री म्‍हणून अतिशय उत्‍तम कामगिरी केली.२०१२-१३ साली मोठा दुष्‍काळ पडला होता.तेव्हा १० लाख जनावरांना चारा छावण्या बांधल्‍या.५ हजार २०० टँकर्समार्फत पाणीपुरवठा केला.राज्‍यात ८ हजार वनरक्षक हे ३०-३५ वर्षांपासून अस्‍थायी म्‍हणून काम करत होते.पतंगरावांनी त्‍यांना सरकारी नोकरीत कायम करण्याचा हटट धरला.अर्थविभागातील अधिका-यांनी याला विरोध केला.मात्र कोणालाही न जुमानता त्‍यांनी हा निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडले आणि ८ हजार वनरक्षक एका दिवसात कायम झाले.कुंडल येथे निर्मित वनअकादमीला डॉ.पतंगराव कदम यांचे नाव देण्यात यावे असेही पृथ्‍वीराज चव्हाण यावेळी म्‍हणाले.

कर्करोगाच्या वाढत्‍या प्रमाणाबाबत विधिमंडळाने पावले उचलावीत-जयंत पाटील
आर.आर.पाटील आणि आता डॉ.पतंगराव कदम हे दोघेही कर्करोगाने गेले.पतंगरावांना रक्‍ताचा कर्करोग झाला होता.महाराष्‍ट्रात सध्या कर्करोगाच्या प्रमाणात मोठी वाढ होत असल्‍याचे सांगून राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील म्‍हणाले,भाज्‍या आणि फळांवर मोठया प्रमाणात होणारी औषधफवारणी याला कारणीभूत असल्‍याचे म्‍हणतात.काही ठिकाणी तर फळे आणि भाज्‍यांवर तकतकीत दिसण्यासाठी दारूही फवारली जाते.अशा आरोग्‍याला हानीकारक औषधफवारणीवर निर्बंध आणण्यासाठी कायदे करण्याची गरज आहे.यावर तज्ञांची समिती स्‍थापन केली गेली पाहिजे.किती वापर करायचा यावर काही मर्यादा आली पाहिजे.विधिमंडळाने यावर विचार करावा असेही जयंत पाटील म्‍हणाले.पतंगरावांनी उभारलेल्‍या साम्राज्‍याला त्‍यांचे पुत्र विश्वजित कदम हे पुढे योग्‍यरित्‍या सांभाळतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्‍त केला.