काँग्रेसचे पकोडे तळो आंदोलन

0

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध; पकोडे तळून केला संताप व्यक्त

देहूरोड । कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करा, विद्यार्थ्यांनी पकोडे तळावेत या शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विधानाचा निषेध नोंदविण्यासाठी देहूरोड शहर काँग्रेसच्यावतीने शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पकोडे तळून जाहीत निषेध नोंदविण्यात आला.

शाळा बंद करणार!
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्हा परिषदेच्या तसेच अन्य सरकारी मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या निर्णयाविरोधात देहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य हाजीमलंग मारिमुत्तू, गोपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेतून मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना पकोडे तळण्याचा अजब सल्ला दिल्याचा संतापही व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांनी पकोडे तळून या विधानाचा निषेध नोंदविला.

तलाठ्यांना निवेदन
जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णा विरन, महिला अध्यक्ष ज्योती वैरागर, प्रदेश सदस्य दिपक सायसर, व्यंकटेश कोळी, मोहन राऊत, संभाजी पिंजण, सुखदेव निकाळजे, टी शेकन्ना, बाळुअण्णा पिंजण, महिला सदस्या गिता रामलिंगम, राणी पांडियण,वंदना सिंग,संगिता सपकाळ, बेबी शेख, अब्रार शेख, गफुरभाई शेख आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येथील तलाठी कार्यालयात मोर्चाचे निषेध सभेत रूपांतर झाले. तंतरपाळे, सायसर, मारिमुत्तू यांनी निषेध व्यक्त केला. तलाठी पवार यांना निवेदन देण्यात आले.