नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या कुटुंबीयांविरोधात विदेशात अघोषित संपत्ती जमा केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल होण्यावरून भाजपाने हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या या प्रकरणावर काही भाष्य करणार आहेत का, त्यांच्यावर काही कारवाई करणार आहेत का, असा सवाल संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केला आहे.
माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्यावर विदेशातील संपत्तीची संपूर्ण माहिती न दिल्याचा आरोप असल्याचे सीतारमन यांनी सांगितले. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने त्यांच्या कुटुंबीयांविरोधात चार आरोपपत्र दाखल केले आहेत. नवाझ शरीफ यांच्याप्रमाणे चिदंबरम यांनाही राजकारणापासून काँग्रेस दूर करेल का, असा प्रश्न त्यांनी राहुल गांधी यांना विचारला. शरीफ यांच्याप्रमाणेच चिदंबरम यांनीही विदेशातील आपल्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात आणि प्राप्तिकर विवरण पत्रात दिली नव्हती.
काँग्रेस अध्यक्ष चौकशी करणार का?
सीतारमन म्हणाल्या, भाजपाला जाणून घ्यायचे आहे की, स्वत: काँग्रेस अध्यक्ष या प्रकरणाची कोणती चौकशी करतील का किंवा या प्रकरणावर बोलतील तर का? त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्याने जी माहिती दिलेली नाही, त्यावर 120 टक्के दंड लागेल. आरोप सिद्ध झाले तर 10 वर्षांपर्यंत त्यांना तुरूंगवासही होऊ शकतो. वर्ष 2015 मध्ये मोदी सरकारने काळ्या पैशावरून कायदा आणला होता. त्याचे उल्लंघन करताना चिदंबरम सापडले आहेत. चिदंबरम यांच्या नावावर विदेशात 21 खाती आहेत आणि 14 देशांत त्यांची संपत्ती आहे. बँकांकडून माहिती घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. चिदंबरम यांनी 2016 मधील प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली नव्हती. त्यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांनीही 2014 पासून कोणतीच माहिती दिलेली नाही.
3 अब्ज डॉलरची अवैध संपत्ती
प्राप्तिकर विभागाच्या मते, चिदंबरम यांच्याकडे 3 अब्ज डॉलरची अवैध संपत्ती आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग आणि तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काळ्या पैशाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमले नाही. मोदी सरकारने सत्तेवर येताच हा निर्णय घेतला होता. –अमित शाह, भाजप