रायपूर : काँग्रेसच्या चार पिढ्यानी देशावर राज्य केले. पण लोकांच्या नशिबी काय आले? त्यांनी फक्त कुटुंबाचा विचार केला, लोकांच्या कल्याणाचा विचार त्यांनी दिला नाही. आता लोकांच्या आशा आकांक्षा ते पूर्ण करतील, यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित करत कॉंग्रेसवर निशाना साधला. ते छत्तीसगडमधील महासमुंद येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसचा ‘फोन बँकिंग’वर विश्वास होता. या फोन बँकिंगनेच बँका उद्ध्वस्त झाल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्यांकडून येणाऱ्या फोनमुळे बनावट कंपन्यांना कर्जे देण्यात आली आणि देशाचे नुकसान झाले, अशी घणाघाती टीकाही मोदी यांनी केली. पुढे मोदी म्हणाले, सीताराम केसरी अध्यक्ष होते तेव्हा काँग्रेसने त्यांना काय वागणूक दिली हे प्रत्येकाला ठाऊक आहे. कुटुंबाशी संबंधित नसलेल्या एखाद्या सक्षम नेत्याला पक्षाचे अध्यक्षपद देण्याचे आव्हान त्यांनी काँग्रेसला दिले. छत्तीसगढमध्ये डॉ रमण सिंग याना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. सलग दहा वर्षे केंद्र सरकार रिमोट कंट्रोलवर चालत होते, त्या सरकारने छत्तीसगढच्या समस्यांकडे लक्ष दिले नाही, असा आरोपही मोदी यांनी शेवटी केला.