पुण्यात राष्ट्रवादी, काँग्रेसचा उमेदवारीसाठी दबाव?
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठीची प्रक्रिया काँग्रेस पक्षात गतीने चालू झाली आहे. पक्षाबाहेरचा उमेदवार नको, असा काँग्रेसजनांचा आग्रह असला तरी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय चालले आहे? याचीही दखल काँग्रेस नेत्यांना घ्यावी लागेल. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश निवड समितीने मोहन जोशी, अभय छाजेड आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्याचवेळी शक्ती अॅपद्वारे कार्यकर्त्यांची मतेही पक्षाकडून अजमावली जात आहेत. राज्यसभा सदस्य संजय काकडे हे सुद्धा काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असून पक्षातील काहीजण काकडे यांचे समर्थन करीत आहेत, परंतु काँग्रेस कमिटीने बाहेरचा उमेदवार नको, असा ठराव करून काकडे यांच्या मार्गात अडसर निर्माण केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातून रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनीही उमेदवारीसाठी दिल्ली गाठण्याचे ठरविले आहे.
दोन्ही पक्षात एकमत?
या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेगळे चालले आहे. पक्षाने पुण्यातील जागेवरील हक्क सोडला असला तरी आपल्या मताने काँग्रेसचा उमेदवार ठरविला जावा, असा प्रयत्न चालू आहे. यात काकडे यांना समर्थन देणारा एक गट आहे आणि पवारसाहेबांचे मत काँग्रेसला विचारात घ्यावेच लागेल, असे बोलले जाते. सद्यस्थितीत भाजपची एकेक जागा कमी करणे महत्त्वाचे आहे. यावर दोन्ही पक्षात एकमत आहे आणि प्रचारही समजुतीने केला जाईल, असे मत काँग्रेसच्या जबाबदार नेत्याने मांडले.