काँग्रेसला राज्यातील सरकार पाडायचंय – नितीन गडकरी

0

मुंबई । त्यांना राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे. म्हणून ते शिवसेनेला युतीसाठी सरकारमधून बाहेर पडण्याच्या अटी घालत आहेत, असा हल्लाबोल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केला. मुंबई महानगरपालिकेतील सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेसच्या संभाव्य युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर गडकरी बोलत होते.

सत्तेसाठी नवे समीकरण बनवू शकते

मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने शिवसेनेने आपले पर्याय खुले ठेवल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापौरपदासाठी शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेऊ शकते. तसेच शिवसेनेकडून काँग्रेसला उपमहापौरपदाची ऑफरही देण्यात आली आहे. शिवाय, शिवसेना फडणवीस सरकारसोबतचे नाते संपुष्टात आणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेसाठी नवे समीकरण बनवू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे. यामुळेच काँग्रेसमधील काही नेतेमंडळी शिवसेनेला समर्थन देण्याची भाषा करत आहे.’
-नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

नितीन गडकरी यांनी संभाव्य युतीचे संकेतावर आपला रोष व्यक्त करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे, तर दुसरीकडे, शिवसेना-भाजपने एकत्र येणे गरजेचे आहे, असेही या वेळी ते म्हणाले आहेत. यापूर्वी गडकरींनी ‘शिवसेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही’, असे वक्तव्य केले होते.