काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे आज राजघाटावर उपोषण

0

नवी दिल्ली । विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज होऊ न शकल्याच्या निषेधार्थ भाजपने 12 एप्रिल रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच देशभरात निर्माण झालेला धार्मिक तणाव आणि दलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळावर राहुल उपोषणाला बसणार असून, काँग्रेसचे कार्यकर्तेही आज देशभरात उपोषण करणार आहेत. यामुळे भारतीय जनता पार्टीची कोंडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राहुल यांच्याबरोबर काँग्रेसचे कार्यकर्तेही एक दिवसाचे उपोषण करणार आहेत. तसेच काँग्रेस कार्यकर्ते सर्व राज्य आणि जिल्हा कार्यालयांवर निदर्शने करणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत राहुल यांनी दलितांच्या मुद्द्यावरून उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारने संसदेचे कामकाज चालू दिले नाही. त्यामुळे पीएनबी घोटाळा, सीबीएसई पेपर लीक, कावेरी मुद्दा, अ‍ॅट्रॉसिटी कायदा आणि आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणे आदी मुद्यांवर चर्चा होऊ शकली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

आगामी लोकसभेसाठी दलित मतांवर लक्ष्य
2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत असून, त्यामुळे दलितांची मते हातची जाऊ नयेत म्हणून काँग्रेस आणि भाजपने राजकारण सुरू केले आहे. त्यामुळेच काँग्रेस दलितांसाठी उपोषण करत असून भाजपने 14 एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांकडून समजते. कॉँग्रेस-भाजपा या दोन्ही पक्षांचेही दलित मतांवर लक्ष असून ती मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.