भुसावळ- जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा वाद निर्माण झाला असून जिल्हाध्यक्षपदी अधिकृतरीत्या मीच असल्याचा दावा मुन्नवर खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. मुन्नवर खान यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष जमील शेख यांनी आपले नियुक्ती पत्र व्हॉट्सअॅप व वर्तमान पत्राद्वारे देत जिल्ह्यातील कार्यकर्ते व जिल्हाध्यक्षांची दिशाभुल केली आहे तसेच अधिकार नसतांना उत्तर महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष ईरशाद जहागीरदारांनी आपल्या पदाचा गैरवापर करून जमील शेख यांची निवड केली आहे. जिल्हाध्यक्ष पदाची निवड करण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्ष यांना असून त्यांनी माझी नियुक्ती केली असल्याने जिल्हाध्यक्ष मीच असल्याचा दावा मुन्नवर खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. तसेच जमील शेख यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वाक्षरीचे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याचे पत्र आणल्यास मी त्वरीत पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचेही पत्रकात नमूद केले आहे. शहरात अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष पदाचा वाद चर्चेचा विषय ठरला आहे.