काँग्रेस नगरसेवकांची गटबाजी हर्षवर्धन पाटलांसाठी धोकादायक

0

इंदापूर । इंदापूर नगरपरिषदेच्या 29 मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी नगराध्यक्षांना सुधारित प्रारूप द्वितीय योजना विकास आराखड्यामध्ये काही बदल करण्याबाबत एक निवेदन दिले. मात्र जो विकास आराखडा सभागृहापुढे मांडलाच नाही, त्या विकास आराखड्यामध्ये बदल करण्याचे निवेदन दिलेच कसे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी सभागृहात अनुपस्थित असणार्‍या काँग्रेसच्या नगरसेवकांच्या सह्यासुध्दा या निवेदनावर आहेत. त्यामुळे हा आराखडा सभागृहात मांडण्याअगोदरच बाहेर कसा पडला? याची चर्चा संपूर्ण इंदापूर तालुक्यात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला हा विकास आराखडा अगोदर कसा मिळाला? हा मुद्दा महत्वाचा ठरला. उपस्थित नसणार्‍या काँग्रेस नगरसेवकांच्या सह्या यावर असल्याने काँग्रेसचा एक नाराज गट राष्ट्रवादीला मिळाल्याचे बोलले जात आहे. यामुळे या फुटीर काँग्रेसच्या नगरसेवकांच्या गटामुळे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटाच मानली जात आहे.

इंदापूरचा सुधारीत प्रारूप द्वितीय योजना विकास आराखडा हा विषय बारामतीचे नगररचनाकार यांच्या पत्रानुसार सभागृहापुढे चर्चिला जाणार होता. मात्र, नगरपालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे बहुमत झाल्यामुळे तो नामंजूर केला. आणि जो इंदापूरचा सुधारीत द्वितीय विकास आराखडा मांडलाच गेला नाही त्यात काय बदल करायचे याबद्दल लेखी निवेदन अगोदरच राष्ट्रवादीचे गटनेते गजानन गवळी यांनी नगराध्यक्ष अंकिता शहा यांना दिले. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपस्थित नगरसेवकांसह काँग्रेसच्या अनुपस्थित नगरसेवकांच्या सह्या होत्या. मग काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्या सह्या कधी केल्या. हा आराखडा अगोदरच गवळी यांच्याकडे कसा आला हा गंभीर विषय निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
उपनगराध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू असतानाच उपनगराध्यक्ष धनंजय पाटील यांना हे पद सोडायचे नव्हते म्हणून त्यांच्या गटाने पद्धतशीरपणे सर्वसाधारण सभेला दांडी मारली. यावरून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी सभेस उपस्थित राहिले नसल्याचे वृत्त आहे. काँग्रेसच्या एका गटाने राष्ट्रवादीला आतून सहकार्य करणे हे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना आगामी विधानसभेच्या दृष्टिने न परवडणारे आहे.