काँग्रेस पक्ष राजकीय लाभासाठी जनतेला मुर्ख बनवतेय – विश्‍वास पाठक

0
आंदोलनाला उत्तर म्हणून गाव आणि शहर पातळीवर खुलासा
पिंपरी चिंचवड : राफेल खरेदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने क्लीनचिट दिली. तरी देखील काँग्रेस पक्षाचे आरोप कायम आहेत. विरोधकांनी जनतेच्या समोर देशाच्या पंतप्रधानांविरोधात चौकीदार चोर है असे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला उत्तर म्हणून पक्ष देशभरात गाव आणि शहर पातळीवर जाऊन यावर खुलासा करत आहे. राफेल व्यवहार नेमका काय आहे, यूपीए सरकारच्या काळात या व्यवहाराबाबत कशी दिरंगाई झाली, रिलायन्स कंपनी या व्यवहारात काय भूमिका पार पाडणार यासंदर्भात भाजपचे पक्षाचे प्रवक्ते विश्‍वास पाठक यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, प्रमोद निसळ, अमोल थोरात, संजीवनी पांडये, आर. एस. कुमार आदी उपस्थित होते.
राफेल विमानाची निवड काँग्रेसची…
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल पत्राच्या आधारावर या व्यवहारातील विमानांच्या किमती, त्याबाबत विरोधक करत असलेले आरोप याबाबतही पाठक यांनी खुलासा केला. राजकीय लाभासाठी देशातील जनतेला मूर्ख बनविण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार गेल्या 70 वर्षापासून काँग्रेसचे विविध नेते करीत आहेत. हे नवीन नाही. राफेल विमानाची निवड 2012 मध्ये काँग्रेसच्या शासनानेच केली. पण कराराबाबत दोन्ही देशात एकमत होत नव्हते. कारण तेथे दलालीचा विषय निकाली निघत नव्हता. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सुत्रे स्वीकारली आणि संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी सुत्रे स्वीकारली आणि या प्रकरणाची सुरुवात झाली.
देशाला 150 विमानांची गरज…
राफेल विमानांचा 2015 मध्ये झालेल्या करारानुसार विमानांच्या खरेदीची किंमत 59 हजार कोटींची होती. मुळ एअरफ्रेमची मूळ किंमत, वैमानिकांचा प्रशिक्षणाचा खर्च, सुरुवातीची दहा वर्षे विमानांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च, विमानांसाठी विशेष बेस तयार करण्याचा खर्च डसाँल्ट कंपनी देणार आहे. भारतातील हवाई दलातील लढाऊ विमानांची संख्या झपाटयाने कमी होत असताना उच्च तत्रज्ञानावर आधारित लढाऊ विमानांची देशाला गरज आहे. आज देशाला 150 विमानांची आवश्यकता आहे. ही दरी भरुन काढण्यासाठी लढावू विमांनांची आवश्यकता असल्याचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या सरकारला जाणवू लागले याकडेही विश्‍वास पाठक यांनी लक्ष वेधले.