पुणे – राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात सत्ता मिळाल्याने काँग्रेस भवनात शेकडो कार्यकर्त्यांनी जमून विजयाचा जल्लोष केला तर पुण्यातील भाजप कार्यालयात शुकशुकाट होता. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात काँग्रेस पक्षाला आघाडी मिळू लागल्याच्या बातम्या येताच शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनात कार्यकर्ते जमू लागले.
राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भव्य छायाचित्रे लावण्यात आली. उत्साही कार्यकर्त्यानी पेढे वाटले , साखर वाटली. ढोली बाजाच्या तालावर बेधुंद नाच करण्यात आले. राहुल गांधी आगे बढो अशा घोषणा देण्यात आल्या. मोदींच्या धिक्काराच्याही घोषणा देण्यात आल्या. आता राहुल गांधीच पंतप्रधान होणार अशा प्रतिक्रिया नेत्यांनी दिल्या. या जल्लोषात पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे , माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, माजी अध्यक्ष अभय छाजेड, नगरसेवक अजित दरेकर , संगीता तिवारी, राजेंद्र भुतडा , रमेश अय्यर आदी सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात शुकशुकाट होता , प्रतिक्रिया देण्यासाठी कोणी नेते उपलब्ध झाले नाहीत.