काँग्रेस सोडून भाजपात जाण्याचा स्वप्नातही विचार नाही

0

माजी आमदार शिरीष चौधरी ; यावल तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांचा संयुक्त मेळावा

फैजपूर- गेल्या 15 दिवसांपासून माजी आमदार शिरीष चौधरी भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगत असून काही वृत्तपत्रांतून तशी बातमी छापून आली आहे मात्र माझ्या वडिलांपासून आम्ही काँग्रेस पक्षाच्या पायावर आम्ही उभे आहोत. माझ्या वडिलांचे नाव पुसून मी दुसर्‍या पक्षात जाण्याचा विचारही करू शकत नाही, असे त्यांनी सांगत मी मुंबईत कोणत्याही भाजपाच्या नेत्यांना भेटलो नाही किंवा भाजपाच्या नेत्यांनी मला फोन करून काही सांगितले नाही त्यामुळे भाजपात जाणार असल्याची केवळ अफवाच असल्याचे ते यावल तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांचा संयुक्त मेळाव्यात म्हणाले. गुरुवारी येथील धनाजी नाना महाविद्यालयात झालेल्या मेळाव्यात त्यांनी आमदार जावळेंंच्या कार्यपद्धत्तीवरही टिका केली.

आमदार जावळे श्रेय लाटत असल्याचा आरोप
सरकार चालवायचे असेल तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी लागते मात्र रावेर यावल मतदार संघात आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक ही माणसे आहे की नाही ? असा प्रश्‍न उपस्थित करीत या जाती-जमातीला सावत्र वागणूक देण्यात आली शिवाय काँग्रेसच्या काळातील विकासकामांचे आमदार हरीभाऊ जावळे श्रेय लाटत असल्याचा आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी येथे केला.

भाजपा सरकार फेकू -माजी आमदार
माजी आमदार चौधरी यांनी सांगितले की, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून रावेर-यावल तालुक्यातील गावा-गावात जाऊन जनतेच्या प्रश्न व समस्या जाणून घेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी भविष्यातील योजना व तरुणांना या जनसंवाद यात्रेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे तसेच भाजपा सरकारने पाच वर्ष आश्वासने देण्यात घालवले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून भाजपा सरकारच्या अपयशाचा पाढा जनते समोर ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रमेश चौधरी, मसाका चेअरमन शरद महाजन, यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, मसाका संचालक नितीन चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले, नगरसेवक कलीम खा मन्यार, देवेंद्र बेंडाळे, प्रा.एस.एस.पाटील, नगरसेवक मनोहर सोनवणे, जनता शिक्षण मंडळ सचिव प्रभात चौधरी, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, प्रचारक डॉ आर.एल.चौधरी, संजीव चौधरी, लिलाधार चौधरी, अलीम शेख, रसूल मेंबर, हाजी शब्बीर सेट, रहेमान खाटीक, काँग्रेसचे अध्यक्ष शेख रीयाज, प्रतिभा मोरे, अनिल जंजाळे, सय्यद अकील फारुकी, सय्यद जावेद जनाब, वसीम जनाब, अशोक भालेराव, शेख शाकीर यांच्यासह यावल तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभाकर सोनवणे तर सूत्रसंचालन माजी नगरसेवक केतन किरंगे यांनी केले.

संत-महंतांच्या थेंब अमृताचे आमदार लाटतात श्रेय
गेल्या दोन महिन्यांपासून यावल-रावेर तालुक्यात थेंब अमृताची कामे करण्यात आली. ही कामे संत-महंत व लोकसहभाग यांच्या माध्यमातून रावेर व यावल तालुक्यात झाली मात्र या कामांचे श्रेय घेण्यात आमदार हरिभाऊ जावळे अग्रस्थानी दिसत आहे. माजी आमदार शिरीष चौधरी हे आमदार असताना 2014 साली सर्वप्रथम शिरीष चौधरी यांनी ही कामे हाती घेतली असल्याचे यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी सांगितले.