जळगाव:पिण्याचा पाण्याचा नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त शहरातील कांचननगरातील महिलांनी आज महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. कांचननगरातील लक्ष्मी नारायण मंदिर परिसरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. या भागातील पाईपलाईन नादुरुस्त झाल्यामुळे मागील एक महिन्यापासून पाणी टंचाई जाणवत आहे. महापालिकेकडे वारंवार मागणी करून देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त महिलांनी अखेर महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. आंदोलकांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. आयुक्त उदय टेकाळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेत, समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर आंदोलाकर्ते माघारी गेले.