कांदळवने हेतुपुरस्सर नष्ट करण्याचा घाट

0

मुंबई । मुंबई महापालिकेच्या कार्यकक्षेत मोडणार्‍या बर्‍याच समुद्र किनार्‍यांवरील कांदळवने हेतुपुरस्सर नष्ट करण्याचा पदोपदी घाट घातला जात आहे, असे निदर्शनास आले आहे. विकासक, भूमाफिया व अनधिकृत बांधकामे करणार्‍यांनी कांदळवनात भराव आणि बांधकामे केल्याच्या घटना सातत्यानेघटना घडत आहेत. हे रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या पातळीवर कांदळवन संरक्षण आणि जतन अधिनियम होणे गरजेचे आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्याकडे केली आहे.

कांदळवन हे जमीन आणि समुद्र यामधील आघात प्रतिबंधक पट्ट्याचे उत्कृष्ट काम करत असते. समुद्राच्या भरती व ओहोटीमुळे होणारी जमिनीची धूप थांबवते. समुद्रातील विविध प्रजातीच्या संरक्षण व संवर्धनाचे काम करते. महत्त्वाचे म्हणजे, जागतिक तापमान वाढीमुळे होणर्‍या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्याचे कार्य कांदळवन करते. उच्च न्यायालयाने 2005 मध्ये कांदळवनक्षेत्राला धक्का पोहचवून 50 मीटरच्या क्षेत्रकक्षेच्या आत बांधकामे बेकायदेशीर असल्याचे ठरवून त्यावर 1986 च्या पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देऊनही विकासक, भूमाफिया व अनधिकृत बांधकामे करणार्‍यांनी कांदळवन क्षेत्रात भराव व बांधकामे केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. पर्यावरण रक्षणासंबंधी कायदाच नसला तरी त्यासाठी लोकजागृती होणे आवश्यक आहे, असे मलिक यांनी महापौरांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.