मुंबई । कांदिवली पूर्व परिसरातील घरगुती वीज वापरणार्यांना आता रिलायन्सचा त्रास सहन करावा लागत असून गेल्या महिनाभरापासून चार ते पाच वेळा वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू झाला आहे. पावसामुळे गेल्या काही दिवसांत नरसीपाडा, आंबेडकर रोड, हनुमान नगर या परिसरातील वीज वारंवार जात असल्याने नागरिक त्रास्त आहेत. रिलायन्स कंपनीचे कामगार त्रिवेणी संगम सोसायटी येथे काम करत असताना लोकांनी वीज केव्हा येणार? असा प्रश्न अधिकार्यांना केला तेव्हा त्यांना उर्मट उत्तरे मिळाली. तरीही रहिवाशांनी 12 तास संयम बाळगला. मात्र, तरीही वीज येत नाही म्हटल्यावर संतप्त रहिवाशांनी घोळका करून रिलायन्सच्या कामगारांना घेराव घातला. त्यानंतर लोकांनी, ’मोठ्या अधिकार्यांना बोलवा व त्यानंतरच काम सुरू करा,’ असा हेका धरला.
रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची धमकी
’ग्राहकांना त्रास द्यावा, असा आमचा उद्देश नाही; पण त्यांच्या सहकार्याशिवाय कर्मचारी काहीच करू शकत नाहीत,’ असेही त्यांनी सांगितले. रिलायन्स कंपनीविरोधात लोक घोषणा देत असताना प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे रिलायन्सचे कामगारदेखील भयभीत झाले होते. आता परत वीज पुरवठा खंडित झाला तर आम्ही सरळ रिलायन्स एनर्जी कार्यालयावर मोर्च काढू, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे.
रिलायन्सकडून सावरासावर
अखेर रिलायन्सचे वरिष्ठ अधिकारी आले आणि त्यांनी लवकर वीज येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर काम करून काही तासांतच वीज आली. या घोषणाबाजीत व्यापारी असोसिशनचे अध्यक्ष ओमप्रकाश जोशी, युवा सेनेचे पदाधिकारी विशाल शेवाळे, सोसायटीचे इतर पदाधिकारी होते. ’रिलायन्सने लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. नाही तर त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल,’ असा इशारा या पदाधिकार्यांनी दिला. दरम्यान, रिलायन्सच्या अधिकार्यास या संदर्भात विचारले असता त्यांनी, ’ग्राहकांचा राग आम्ही समजू शकतो; पण त्यांनी आमच्या समस्या समजून घ्याव्यात. या परिसरातील केबल जीर्ण झाली असून ती बदलली पाहिजे. तेव्हा यावरील लोड कमी होऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होणार नाही,’ असे सांगितले.