कांदिवली येथे अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू

0

मुंबई : कांदिवली येथे अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अपघातानंतर अनोळखी वाहनचालक पळून गेला असून त्याचा सीसीटिव्हीच्या मदतीने पोलिसांनी शोध सुरु केला आहे. मृतांमध्ये साद पीर फिरदोस आणि बिलाल अन्सारी या दोघांचा समावेश आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे.

हा अपघात काल सायंकाळी साडेपाच वाजता कांदिवलीतील समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पश्‍चिम दुतग्रती महामार्गावर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सादर आणि बिलाल हे दोघेही मिरारोडचे रहिवाशी आहेत. सध्या ते वांद्रे येथील रिझवी महाविद्यालयात शिकत होते. सादर हा हॉटेल मॅनेजमेट तर बिलाल हा इंजिनिअरचे शिक्षण घेत होते. काल सायंकाळी सादच्या अ‍ॅक्टिव्हामधून वांद्रे येथील मिरारोडच्या दिशेने जात होते. सादने हेल्मेट घातले नव्हते. समतानगरजवळ येताच मागून भरवेगात जाणार्‍या एका अनोळखी वाहनचालकाने त्यांना धडक दिली होती. यावेळी सादचे नियंत्रण सुटले आणि त्याने तेथील डिवायडरला जोरात धडक दिली होती. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. पोलीस शिपाई अनिल शिंदे यांना हा अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी गेले. त्यांनी रिक्षातून या दोघांनाही तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे सादला मृत घोषित करण्यात आले तर बिलालचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. शिंदे यांच्याकडून ही माहिती नंतर समतानगर पोलिसांना देण्यात आली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पळून गेलेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. एकाच वेळेस दोन महाविद्यालयीन तरुणांचा अपघाती मृत्यूने मिरारोड येथील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.