कांदे विकून आलेले पैसे पाठविले पीएम सहायता निधीला; मोदींनी घेतली दखल !

0

नाशिक- कांद्याला भाव नसल्याने हा कांदा विकून त्यातून आलेले पैसे पंतप्रधान सहाय्यता निधीला दान करणाऱ्या शेतकऱ्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. याप्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने कांदा प्रश्नाबाबतची माहिती नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मागितली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल सादर केला आहे.

नाशिकमध्ये संजय साठे या शेतकऱ्याच्या शेतातील ७५० किलो कांदा अवघ्या १ हजार ६४ रुपयांना विकाला गेला. म्हणजे प्रतिकिलो कांद्याला केवळ १ रुपया ४० पैसे दर मिळाला. त्यामुळे या शेतकऱ्याने या विक्रितून आलेले सर्व पैसे निषेध म्हणून पंतप्रधान सहाय्यता निधीला दान केले होते.

शेतमालाला कमी दर मिळत असल्याबद्दल सरकारच्या धोरणांवर आपण नाराज असल्याचे संजय यांनी म्हटले होते. माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही. मात्र शेतकऱ्यांच्या दुःखाबद्दल सरकारची उदासीनता पाहून संताप होत असल्याची आपली भावना आहे. संजय यांनी २९ नोव्हेंबर रोजी निफाड पोस्ट ऑफिसमधून ‘नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान’ या नावाने मनी ऑर्डर पाठवली. देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी ५० टक्के कांद्याचे उत्पादन हे नाशिक जिल्ह्यामध्ये होते. असे असतानाच कांद्याला इतका कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

२०१० साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीवर आले असताना त्यांनी काही मोजक्या प्रगशील शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यामध्ये संजय यांचा समावेश होता. मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये ओबामा यांच्या भेटी दरम्यान भरवण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये त्यांनी एक स्टॉल लावला होता. त्यावेळी ओबामा आणि संजय यांनी एका दुभाषकाच्या मदतीने काही मिनिटे संवाद साधला होता.