कांद्याला चांगला बाजारभाव; शेतकरी सुखावला

0

चिंबळी । या वर्षी रब्बी हंगामातील कांदा पिकाला चांगला बाजार भाव मिळत असल्याने खेड तालुक्यातील चिंबळी, केळगांव, कुरुळी, निघोजे परिसरातील शेतकरीवर्ग सुखावला आहे. यावर्षी कांद्याला पोषक हवामान मिळाल्याने पिकाची वाढ चांगली आहे. परीणामी उत्पादन देखील वाढ झाली असून, सध्या बाजार भाव प्रती किलोस 17 ते 18 रुपये मिळत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून कांद्याला बाजारभाव मिळत नव्हता. परंतु यावर्षी मात्र कांदा काढणीला सुरुवात झाली आणि किरकोळ बाजारात 30 ते 35 रुपये प्रति किलो भाव मिळाला होता. या वर्षी एकरी 200 ते 250 पिशव्या निघत असून, एकरी कांदा पिकाला 30 हजार रुपये खर्च होत आहे. सध्या बाजारभाव स्थिर झाले आहेत.

आखाती देशात निर्यात
खेड तालुका राज्यात कांदा उत्पादन म्हणून ओळखला जातो. चाकण बाजारात व्यापारी मोठ्या प्रमाणात माल खरेदी करून आखाती देशामध्ये पाठविला जातो. गेल्या पाच वर्षांपासून शेतकर्‍याचे फार मोठे नुकसान झाले होते. परंतु यावर्षी कांदा पिकाला सुरुवातीला थंडीचे हवामान पोषक ठरल्याने उत्पादनात वाढ होऊन बाजारभाव चांगला मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे.