कांद्याला मोसमातील सर्वाधिक भाव

0

मंचर : मातीमोल झालेल्या कांदा व टोमॅटो पिकांमुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍याला दिलासा मिळत आहे. कांद्याला क्विंटलला 1500 रुपये मिळत आहेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यास क्विंटलला 900 ते 1600 रुपये असा बाजारभाव मिळाला. या मोसमातील हा सर्वाधिक बाजारभाव आहे.
बराखीतील शिल्लक कांदा शेतकरी विक्रीसाठी आणत आहेत. कांद्याला इतर राज्यातून मागणी वाढली आहे. मध्य प्रदेश राज्यातील कांदा संपत आला असून दिल्लीतून कांद्यास मागणी वाढल्याने कांद्याचे बाजारभाव वाढल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार, गुरुवार व रविवार या तीन दिवशी कांद्याची लिलाव पद्धतीने विक्री होते. 25 व्यापारी कांद्याची विक्री करतात तर 35 खरेदीदार माल खरेदी करून तो राज्याबरोबर इतर राज्यांत पाठवतो. कांद्याचे बाजारभाव मागील लिलावापेक्षा क्विंटलला 400 रुपयांनी वाढले गेले. 900 ते 1600 रुपये क्विंटल असा बाजारभाव आजच्या लिलावात मिळाला आहे. मागील वर्षी याच वेळी क्विंटलला केवळ 600 ते 900 रुपये भाव मिळाला होता. यावर्षी आवक वाढलेली असूनसुद्धा भाव कडाडले आहेत. गुलटी कांद्याला 600 ते 700, तर बदला कांद्यास क्विंटलला 400 ते 500 रुपये भाव मिळाला आहे. बदला कांद्याचेही शेतकर्‍यांचे चांगले पैसे मिळत आहे. कांद्याचे बाजारभाव वाढल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात टोमॅटो पिकासाठी उच्चांकी क्रेटला 1500 रुपये भाव मिळत होता. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना चांगलाच फायदा झाला. मात्र आता सतत पडत असलेल्या पावसामुळे आवक घटली असून बाजारात चांगला मालही येत नसल्यामुळे भाव निम्म्याने उतरले आहेत. क्रेटला 900 रुपयांपर्यंत भाव मिळाले आहेत. दिवसाला 25 हजार क्रेट इतकी आवक सुरू आहे.

जुन्नर बाजार समितीच्या ओतूर उपबाजार पेठेत 17 हजार 390 कांदा पिशव्यांंची आवक झाली. प्रति 10 किलोस प्रतवारी नुसार 60 ते 135 रुपये बाजार भाव मिळाला, असे सभापती संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी सांगितले.