शहादा । तालुक्यातील काकर्दे दिगर येथे लग्नात आलेल्या धुळे तालुक्यातील एका 30 वर्षीय इसमाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. संशयित आरोपींना अटकेनंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी. सोनटक्के यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
व्हिडिओ शूटिंगमुळे आरोपी अडकले
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी लग्न कार्यातील त्या दिवसाचे व्हिडिओ शूटिंग तपासण्याचा निर्णय घेतला. याच व्हिडिओ शूटिंगमधून पोलिसांना धागेदोरे सापडले. संशयित आरोपी प्रवीण कोळी व गावठी पाटील हे मयत विलास पाटील याचा पाठोपाठ जाताना व्हिडिओ शूटिंगमध्ये पोलिसांना दिसले. मात्र, काही वेळेनंतर आरोपी परत आले. तेव्हा मयत विलास पाटील हा परतला नसल्याचे शूटिंगमध्ये दिसते. त्यावरून आरोपींवर पोलिसांचा संशय बळावला. पुढील तपासात आरोपी बरोबर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. फरार असलेला गावठी पाटील याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
लग्नात बोलावून काढला काढा
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विलास भागवत पाटील (वय 30, रा. कौठळ. ह.मु. सुरत) हा मागील दोन वर्षांपासून सुरत येथे प्रवीण कोळी याच्या दारूच्या गुथ्थ्यावर कामास होता. प्रवीण कोळी हा दीड वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात सुरतच्या कारागृहात होता. त्याने दोन वर्षांपूर्वी एका विधवा व त्याच्यापेक्षा 8 वर्षे वयाने मोठ्या महिलेशी लग्न केले होते. लग्नाच्या 6 महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात तो जेलमध्ये गेला. त्याचा दारुचा व्यवसाय सांभाळत असतांना विलास पाटील याचे प्रवीण कोळी याच्या पत्नीशी अनैतिक संबंध जुळल्याचा प्रवीणला संशय होता. याच संशयावरुन विलास पाटील यास काकर्दे येथे 6 मे रोजी लग्नात बोलवून रात्री 12 वाजेच्या सुमारास आरोपी प्रवीण कोळी व गावठी पाटील यांनी त्याचा खून केला.
डॉक्टरांना संशय; आरोपी पसार
सदर घटनेचा डॉक्टरांना संशय आला. त्यामुळे आरोपी विलासचा मृतदेह सोडून तेथून पसार झाले. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी लग्नाच्या दिवशी झालेल्या व्हिडिओ शूटिंगची तपासणी केली असता आरोपी प्रवीण कोळी व गावठी पाटील हे मयत विलास पाटील याच्या पाठोपाठ जातांना आढळून आले. यावरूनच पोलिसांनी आरोपींचा छडा लावला.
अशी आहेत संशयितांची नावे
या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी प्रवीण उर्फ अंबालाल कोळी (मूळ रा. काकर्दे, ता. शहादा), आधार भाईदास कोळी, सुनील आधार कोळी, हेमंत कोळी, प्रल्हाद कोळी यांना अटक केली आहे. गावठी पाटील (रा.खोंडामळी) हा संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
खून करून नेले रुग्णालयात
आरोपी प्रवीण कोळी याने गावठी पाटील याच्या मदतीने विलास पाटील याचा खून केला. त्यानंतर मयत विलास पाटील यास आरोपी आधार भाईदास कोळी, सुनील आधार कोळी, हेमंत कोळी, प्रल्हाद कोळी यांनी टाटा कंपनीच्या चारचाकी गाडीत टाकून वडाळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. दवाखान्यात अपघात झाल्याची बतावणी करुन डॉक्टरांना उपचार करण्यास विनंती केली. तेथून विलास यास रुग्णवाहिकेद्वारे शहादा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी विलासला मयत घोषित केले. रूग्णालयात आरोपींच्या हालचाली संशयित होत्या.