चोपडा : चोपडा तालुक्यातील काजीपुरा येथून चार लाख 16 हजार 250 रुपये किंमतीचे प्रतिबंधीत बियाणे जप्त करण्यात आले असून या प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
काजीपुरा येथील दत्तात्रय शालिग्राम पाटील यांच्याकडे पिंक कॉट कंपनीच्या प्रतिबंधीत कंपनीच्या बियाणे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तीन दिवस पाळत ठेवण्यात आली व रविवारी दुपारी चार वाजता कारवाई करून 333 बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके यांनी संशयित पाटील यास ताब्यात घेत त्याच्याविरोधात कापूस बियाणे नियंत्रण आदेश 1983 चे खंड 3,4,7,8 (अ) 9 चे उल्लंघण केल्याचा तसेच विनापरवाना बियाणे साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.