कातकरी समाज उत्थान अभियानाचा जनतेने लाभ घ्यावा -रवींद्र बोंबले

0

नागोठणे । दर्‍याखोर्‍यात राहून कातकरी समाज रोजगार तसेच पोटापाण्याच्या निमित्ताने इतर ठिकाणी जात असतात. शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही, अशा समाजाला मुख्य प्रवाहात आणता आले पाहिजे, हे डोळ्यासमोर ठेवून कोकण आयुक्त जगदीश पाटील यांनी कातकरी समाज उत्थान अभियान ही संकल्पना उदयास आणली आहे. या समाजाने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल खात्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले यांनी केले. कातकरी समाज उत्थान अभियानांतर्गत विभागातील सुकेळी आदिवासीवाडीत शिबिर पार पडले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात बोंबले बोलत होते. रायगडमध्ये रोहे आणि सुधागड या दोन तालुक्यांमध्येच कातकरी समाज मोठा असून पहिल्या टप्प्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात त्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आता दुसर्‍या टप्प्यात या योजनेला मूर्तस्वरूप देत त्यांना आज याठिकाणी घेण्यात आलेल्या शिबिरात सर्व प्रकारचे दाखले, आधार कार्ड नोंदणी, आरोग्य तपासणी या योजना राबवण्यात येत असल्याचे बोंबले यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. आपल्या उन्नती व प्रगतीसाठी असणारे दाखले देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आज आपल्या वस्तीमध्ये आली आहे. आपण या योजनांचा लाभ घेतला, तर अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या परिश्रमाचे खर्‍या अर्थाने सार्थक झालेले असेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

कातकरी तळागाळातील समाज
कातकरी हा तळागाळातील समाजातील आहे. त्यांना दाखले मिळण्यासाठी आपला रोजगार सोडून धावाधाव करावी लागत असल्याने आयुक्त पाटील यांनी राबवलेली ही योजना स्तुत्य अशीच आहे. आज हा कार्यक्रम सुकेळी येथे होत आहे. याच ठिकाणी 26 वर्षांपूर्वी स्थानिक कंपनीकडून येथील चार आदिवासीवाड्यांवर झालेल्या अत्याचाराबाबत आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी झाले होते. त्यांचे पुनर्वसन केले असले, तरी काही उणिवा बाकी असल्याने प्रांताधिकार्‍यांनी पुढाकार घेत जिंदाल कंपनीबरोबर बैठक घेऊन प्रश्‍न सोडवावे असे अ‍ॅड. उल्का महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी तहसीलदार काशीद यांचेसुद्धा मार्गदर्शनपर भाषण झाले.

या कार्यक्रमाला जि. प. सदस्य किशोर जैन, तहसीलदार काशीद, पं. स. सदस्य संजय भोसले, सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या अ‍ॅड. उल्का महाजन, सरपंच गणपत निरगुडे, वन क्षेत्रपाल समीर शिंदे, शिक्षण खात्याचे सादुराम बांगारे, अरुणादेवी मोरे, आरोग्य खात्याचे डॉ. नितिन नेटके, पो. उपनिरीक्षक मनोज मोरे, पशु वैद्यकीय विभागाचे डॉ. सोमनाथ भोजने, नायब तहसीलदार बांदिवडेकर, टोळे, ग्रा. पं. सदस्य संतोष लाड, मनोहर सुटे, कृषी खात्याचे महामुनी, नागोठणे मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल, तलाठी सजाचे अतुल जोशी, दामोदर शिंदे, शिवाजी केंद्रे, ललिता शिर्के, योगिता टवळे, अनिता भुक्केवाड, वन खात्याचे सुहास रणवरे, कान्हा सोबरी, गौरी तोरवे, एकनाथ धुळे, रवींद्र शिंदे आदींसह विविध खात्यांचे कर्मचारी उपस्थित होते.