कात्रज । कात्रज पुणे शहराचे दक्षिणकडील प्रवेशद्वार. मुख्य चौकात कात्रज पीएमपीएमएलचे बस स्टँड आहे. याठिकाणी कात्रजकडे येणार्या बससे वळतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. बस स्टँडजवळ पार्किंग नाही. तसा तेथे नो पाँर्किंगचा बोर्डही लावलेला आहे. तरीही येथे दुचाकी पार्क केल्या जातात. विशेष म्हणजे मागील बाजूस कात्रज पोलिस चौकी आहे. हा बस स्टँड अपुरा पडत असल्याने तो पुढे वाढविण्यात आला आहे. या ठिकाणी सुध्दा नो पार्किंग असून तेथे दुचाकी पार्क केल्या जातात. त्यामुळे नागरिकांची गैरोसय होते.
बसस्थानकाची अवस्था दयनीय
बसस्थानकाची अवस्था तर दयनीय आहे. छप्पर नाही, अपुरी आसन व्यवस्था त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. बसस्थानका शेजारी तीन चाकी, सहा आसनी रिक्षा उभ्या असतात. कात्रजकडून मुंबईकडे रस्ता वळताना सहाआसनी रिक्षांची दुहेरी पाँर्किंग असते यामुळे वाहने वळविताना चालकाला त्रास सहन करावा लागतो. पादचार्यांना तर चालणेही कठीण होऊन बसले आहे. अनेकवेळा प्रवाशांवरून या रिक्षा चालकांमध्ये भांडणे होतात. त्यांचा त्रास प्रवास करणार्या प्रवाशांना होता असतो.
चढणीवर वाहने पडतात बंद
कात्रज चौकात मालकी जमीन व महानगरपालिका यांच्यामध्ये वाद सुरू आहे. हा वाद मिटला तर सोयीस्कर मार्ग होईल. चौकाच्या पलिकडचा रस्ता हडपसरकडे जातो. हडपसरकडून येणारे डंपर, अवजड वाहनांची कात्रजचा अरुंद रस्ता चढताना दमछाक होते. आठवड्यातून दोन ते तीन दिवस वगळता रस्त्याच्यामध्येच जड वाहने बंद पडलेली असतात. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. समोरील अरूंद रस्ता हा दत्तनगर चौकाकडे जातो. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूने येणारी वाहने व रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते.
चौक अंधारात
मुंबईकडे वळताना छोटा कोरडा कॅनल आहे. त्यामध्ये भर घातल्यास कॉर्नरचा रस्ता मोठा होईल. यामुळे वाहतूकीवरील ताण काही प्रमाणात कमी होईल. बीआरटीचे काम सुरू असल्याने मुख्य रास्त्याच्या एका बाजूला तीन, सहाआसनी रिक्षा उभ्या असतात. वाहनधारकावर वेग मर्यादाचे बंधन नाही. यामुळे छोटे, मोठे अपघात होतात. संध्याकाळी तर या मुख्य चौकात अंधार पसरलेला असतो. लाईटचा खांब चौकापासून अर्धा फूट लांब आहे. तर दुसर्या बाजूला असणार्या लाईटच्या खांबावर तीनच दिवे सुरू असतात. यामुळे मुख्य चौकात अंधार असतो.
वाहतूक पोलिसांची कसरत
संध्याकाळी वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागते. डाव्या बाजूला वाहतूक व्यवस्थीत रहावी याकरीता शहराकडे जाणार्या वाहनांना झेब्रा काँसिगच्या पुढे आणून सिंग्नलपर्यंत उभ्या करतात. रात्रीच्या वेळेस चौकाच्या बाजूला खाजगी गाड्या थांबत असल्याने बाकीच्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. महाराष्ट्र परिवाहन महामंडळाच्या गाड्यांनाही येथे व्यवस्थीत थांबा नाही. या चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या चौकातील बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करावी, चौकातील वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी लवकरात लवकर तोंडगा काढावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.