कात्रज । महापालिकेच्या हद्दीलगत येणार्या मांगडेवाडी भिलारेवाडी व गुजर-निबाळकरवाडी या ग्रामपंचातीच्या अंतर्गत मलवाहिनी विकसित करण्यासाठी 10 कोटीचा निधी देण्याचा प्रस्तावाला सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
महापालिकेकडून उपाययोजना नाही
पेशवेकालीन असलेल्या या तलावाचे पाणी शहराला पुरविण्यात येत होते. ऐतिहासिक वारसा असलेल्या या तलावात आजूबाजूच्या भिलारेवाडी आणि मांगडेवाडी व गुजर-निबाळकरवाडी या गावांमधील मैलापणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे तुडुंब भरलेल्या या तलावातील पाण्याला दुर्गंधी सुटलेली आहे. हे मैलापाणी रोखण्यासाठी महापालिकेकडून कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे.
त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी देखील काही दिवसांपूर्वी या ठिकाणी भेट दिली होती. त्यानंतर या गावातील प्रदूषित पाणी रोखण्यासाठी महापालिकेकडून त्या गावच्या हद्दीत मैलापाणी वाहिनी विकसित करण्याचा 10 कोटीच्या निधीचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या मैलापाणी शुद्धीकरणासाठी येणारा खर्च संबंधित ग्रामपंचायतीकडून वसूल करण्यासाठी करारनामा करणे आणि अटी-शर्ती निश्चित करण्यासाठी आयुक्तांना देण्याची मागणी या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
28 एकरात उद्यानाचा विकास
या गावातील दूषित पाण्यामुळे कात्रज तलावातील पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. महापालिकेने गेल्या काही वर्षांत या परिसरात दहा ते बारा कोटी रुपये खर्च करून नानासाहेब पेशवे तलाव आणि उद्यानाचा विकास केला. तलावाच्या आजूबाजूला असलेल्या झाडीमध्ये सुंदर असा ‘वॉकिंग ट्रॅक’ सुरू करण्यात आला. या सुविधेचा नागरिकांकडून दररोज लाभ घेण्यात येत आहे. जवळपास सतरा एकर परिसरात उद्यान आणि तलाव, याच परिसरात फुलराणी, आजी-आजोबा उद्यान असा 28 एकर परिसरात या सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आवाहन
येथील विविध वाड्यांच्या निवडणुका या 26 डिसेंबरला होत आहेत. त्यावेळी आचारसंहितेचे पालन करा. शक्तिप्रदर्शन करू नये. निवडणुका शांततेने चांगल्यापद्धतीने पार पाडाव्यात असे आवाहन भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी केले. मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने निवडुका शांतपणे पार पाडाव्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ग्रामपंचायतीच्या उमेवारांची बैठक भारती विद्यापीठ ठाण्यात घेण्यात आली. खेड-शिवापूरचे मंडळ अधिकारी शेखर शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, उपनिरीक्षक शक्तिसिंग खानविलकर आदी उपस्थित होते.