प्रवेश शुल्क 25 वरून झाले 40 रुपये : पर्यटकांची संख्या घटण्याची शक्यता
पुणे : वाघ, हत्ती, हरीण, माकड, अस्वल, साप अशा विविध प्राण्यांमुळे पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. मात्र, आता हे प्राणी पाहण्यासाठी तसेच संग्रहालयात सफर करण्यासाठी पर्यटकांना दुप्पट प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे. लहान मुलांबरोबर येणार्या पालकांची येथे संख्या वाढत असताना अचानक होणार्या या शुल्कवाढीवर आता पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली असून याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. 4 फूट 4 इंचापेक्षा अधिक उंची असलेल्या (प्रौढ) व्यक्तींना सध्या 25 रुपयांचे प्रवेश शुल्क आकारले जात असून त्यात वाढ करून ते 40 रुपये केले आहे. तसेच, संग्रहालयात फिरण्यासाठी बॅटरी ऑपरेटेड वाहनाचे शुल्क 40 वरून 50 रुपये केले आहे. कात्रज प्राणी संग्रहालयाला दरवर्षी किमान तीन ते चार लाख पर्यटक भेट देतात. त्यामध्ये प्रौढ व्यक्तींचे प्रमाण साठ ते सत्तर टक्क्यांच्या आसपास आहे. याचे निरीक्षण करून प्रौढांच्या शुल्कात 25 रुपयांवरून 40 रुपये शुल्क आकारल्यास येथे येणार्या पर्यटकांची संख्या कमी होऊ शकते, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
1 जानेवारीपासून अंमलबजावणीची शक्यता
कात्रज प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कवाढीची अंमलबजावणी येत्या 1 जानेवारीपासून होण्याची शक्यता आहे. ही शुल्क वाढ फक्त प्रौढांसाठी असून अन्य शुल्कात वाढ करण्यात आली नसल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी दिली तसेच या वाढीव शुल्कातून संग्रहालयाचा विकास करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटकांना भुर्दंड
शुल्कवाढीमुळे आता दोन मुले, आई-वडील अशा एका कुटुंबाला या ठिकाणी येण्यासाठी 150 रुपयांच्या वर खर्च प्रवेशासाठी येणार आहे. त्याचप्रमाणे आता बॅटरी ऑपरेटेड गाड्यांसाठीही चाळीस रुपयांऐवजी 50 रुपये शुल्क मोजावे लागणार म्हणजे प्रवेशाला वेगळा खर्च, कॅमेरा असणार त्यासाठी 50 रुपये, व्हिडीओ चित्रीकरणासाठी 200 रुपये आणि गाईडसाठी 50 रुपये शुल्क, असा सगळा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे ही शुल्कवाढ रद्द करावी. योगेश पाटील, पर्यटक
पर्यटकांची संख्या कमी होईल
ही शुल्कवाढ अधिक आहे. तसेच, येथे येणार्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठी आहे. वनडे पिकनिकसाठी हे ठिकाण सर्वांच्या पसंतीस उतरते. मात्र, जर शुल्क वाढले, तर येथे येणार्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. ज्योती वेद, पर्यटक