यवत । राज्य सरकारची फसवी कर्जमाफी आणि शेतकरीविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी दौंडमधील शेतकर्यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. या आंदोलनाचा शनिवारी दुसरा दिवस होता. कानगाव येथील शेतकर्यांनी संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळून सरकारचा निषेध नोंदवला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकर्यांनी केला आहे. मागील वेळेस शेतकरी संपाचे केंद्र अहमदनगर येथे होते. तेथूनच हा संप राज्यभर पसरला. यावेळेस या संपाचे केंद्र दौंडमधील कानगाव झाल्याचे दिसून येत असून, लवकरच या आंदोलनाची व्याप्ती व तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
दूध, भाजीपाल्याचा पुरवठाही बंद
पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील 122 गावांनी या संपाला पाठिंबा दर्शविला असून, विविध शेतकरी संघटना या आक्रोश आंदोलनात आणि संपात सहभागी झाल्या आहेत. दौंड तालुक्यातील 50 गावच्या ग्रामपंचायतींनी या शेतकरी आक्रोश संपाला पाठिंबा दिला आहे. यामुळे पुढील काही दिवसामध्ये या गावांना संपात सहभागी करून घेतले जाणार आहे. भैरवनाथ मंदिरामध्ये शेतकर्यांची आणि किसान क्रांती संघटनेच्या पदाधिकार्यांनी निषेध सभा घेतली. दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठाही शेतकरी बंद करणार आहेत. यासाठी गावागावात 40 शेतकरी युवकांची एक कृती समिती तयार करण्यात आली आहे. शेतकर्यांनी सरकार पुढे 11 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे कानगावचे सरपंच संपत फडके यांनी सांगितले.
आमदार कुल यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आंदोलनकर्त्यांची शनिवारी भेट घेतली. उपोषणाला बसलेल्या शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या शासन दरबारी पोहचविण्याचे त्यांनी आश्वासन दिले. शेतीमालाला हमीभाव मिळवा, संपूर्ण व सरसकट कर्जमाफी मिळावी, जमीन मूल्यांकनाच्या आधारे 80 टक्के दीर्घमुदतीचे कर्ज कमीत कमी व्याजदराने मिळावे, शेतकर्यांना निवृत्ती वेतन मिळावे या अंदोलकांच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्याचे व शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास कुल यांनी यावेळी व्यक्त केला.