कापाशी पिकांंचे पंचनामे करा

0

साक्री । तालुक्यातील शेतकरी कपाशीवरील बोंड अळीने हवालदिल झाला असून शासन या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी कपाशी पिकांच्या क्षेत्राचे पंचनामे लवकर करतील असे वाटले होते मात्र तसे झाले नाही. म्हणून शेतकर्‍यांनी उभ्या कपाशी पिकात नांगर चालवून कपाशीचे पिक शेतातून काढले.कपाशीचे पीक काढल्यानंतर कृषी विभागाचे कर्मचारी व तलाठी पंचनामे करण्यासाठी शेतात आले व फक्त उभ्या पिकाचे पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश असल्याचे सांगत पंचनामे करण्यास असमर्थता दर्शविली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शेतकर्‍यांनी काँगे्रसचे युवानेते हर्षवर्धन दहिते, बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे यांच्या नेतृत्वात तहसीलदार संदीप भोसले व कृषी अधिकार्‍यांना निवेदन देवून कपाशीच्या सर्वच क्षेत्राचे पंचनामे करावेत अन्यथा तहसिल कार्यालय कामकाज बंद पाडण्याचा तसेच आंदोलनाचा इशारा दिला.

कापुस उत्पादकांना नुकसान भरपाई द्या
या निवेदनाद्वारे शेतकर्‍यांनी मागणी केली की, ज्यांचा सातबारावर कपाशी पिकाची नोंद आहे. त्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करावेत व कपाशी उत्पादक शेतकर्‍यांना एकरी 25 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी अन्यथा साक्री तालुका काँगे्रसच्या वतीने तहसिल कार्यालयाचे कामकाज बंद पाडण्यात येईल, असा इशाराही दिला. निवेदनावर पोपटराव सोनवणे, हर्षवर्धन दहिते, नरेंद्र खैरनार, पं.स.सदस्य उत्पल नांद्रे, दिगंबर पवार,लक्ष्मीकांत शहा, मुन्ना देवरे, अनिल बावीस्कर, बाजार समितीचे संचालक शिरीष सोनवणे, प्रफुल्ल नेरे, दिनेश सोनवणे, प्रविण देवरे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या असून निवेदन देण्यासाठी माळमाथा भागातील शेकडो शेतकरी तहसिल कार्यालयात उपस्थित होते.

पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, शासनाने कपाशी पिकावरील बोंडअळीने केलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कपाशी वेचणे ही शेतकर्‍याला शक्य झाले नाही. म्हणून तालुक्यातील 95 टक्के शेतकर्‍यांनी उभ्या कपाशीवर नांगर फिरवला आणि कृषी विभाग व महसूल विभागाचे कर्मचारी गावात येवून उभे राहिले त्यांना शेतकर्‍यांनी विचारले असता शासनाने उभ्या असलेल्याच कपाशीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने ज्यांनी पिकावर नांगर फिरवला त्याचे काय असा प्रश्‍न उपस्थित केला.