कापूसवाडीतील तरुणाचा मृतदेह आढळला : घातपाताचा आरोप

जामनेर : तालुक्यातील कापूसवाडी येथील 38 वर्षीय तरूणाचा शेताच्या बांधावर मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून पाच संशयितांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. उत्तम रघुनाथ धोनी (38, रा. कापूसवाडी, ता.जामनेर) असे मयताचे नाव आहे.

शेतात आढळला मृतदेह
बुधवार, 6 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता उत्तम धोनी यांचा मृतदेह विजय उबाळे यांच्या शेतात मयत अवस्थेत आढळला आहे. याबाबत जामनेर पोलिसात डॉ. आर के पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत अद्याप पोलिसांकडून स्पष्टता झालेली नाही. दरम्यान पतीचा घातपात केल्याचा आरोप मयत उत्तम धोनीची पत्नी यांनी केला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.