काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शिया सांस्कृतिक केंद्रात गुरूवारी झालेल्या भीषण स्फोटात 40 जण ठार झाले. यामध्ये अनेक लोक गंभीर जखमीही झाले आहेत. अफगाणिस्तान गृहमंत्रालयाचे उप प्रवक्ते नसरत रहिमी यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला असून हल्लेखोरांनी तबायान सांस्कृतिक केंद्राला लक्ष्य करून हा हल्ला केल्याचे म्हटले आहे. स्फोटानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला होता. सोव्हिएत संघाच्या अफगाणिस्तानवरील आक्रमणाला गुरूवारी 38 वर्ष पूर्ण झाल्यानेच हा हल्ला केला गेला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या स्फोटाची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
एकाच कुटुंबातील तीन ठार
या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीय सध्या आप्तेष्ठांचा शोध घेत आहेत. प्रेसिडेंट अशरफ गनी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हा मानवते विरोधातील गुन्हा असल्याचे म्हटले आहे. याचवर्षी मे महिन्यात काबूलमधील भारतीय दुतावासाजवळही हल्ला झाला होता. त्यात जवळपास 90 जण ठार झाले होते. 300 हून अधिक जखमी झाले होते. गुलाई दावा खाना परिसरात 24 जुलै ला आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यात 24 जण ठार झाले होते. तर 42 जखमी झाले होते.
अमेरिकन सैन्यामुळे अडचणी वाढल्या
दहशतवादाच्या विरोधातील लढाईत अमेरिका आणि विदेशी सैन्य अफगाणिस्तानची मदत करत आहे. सध्या येथे 8400 अमेरिकन सैनिक आणि 5000 नाटो सैनिक आहेत. त्यांचे मुख्य काम सल्लागार म्हणून काम करणे असे आहे. सहा वर्षांपूर्वीपर्यंत येथे एक लाखांहून अधिक अमेरिकन सैनिक होते. 2011 ते 2013 पासून अमेरिकन लष्कर आल्यापासून येथील हल्ल्यांत वाढ झाली आहे.