पुणे । केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाच्या तसेच थेट सामान्य नागरिकांशी संबंधित योजना राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. याबरोबर दैनंदिन कामकाज करताना संवाद, कार्यक्षमता आणि गतिमान कामकाज अशा त्रिसूत्रीवर भर देण्यात येईल, अशी ग्वाही नवनियुक्त जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
नवल किशोर राम यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आगमन झाले असता अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी, विविध शाखांचे तहसीलदार राम यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मावळते जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्वत: राम यांच्या बरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला आणि त्यानंतर पदभार नवनियुक्त जिल्हाधिकारी राम यांच्याकडे सोपविला.
राम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकार्यांची ओळख करून घेतली. सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी अतिशय सक्षमपणे कार्यरत असून, त्यांच्या सहकार्यामुळेच गेली चार वर्षे उत्कृष्ट काम करता आल्याचे या वेळी सांगितले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विशेषत: पुण्यातील प्रशासनाबाबत नेहमीच औत्सुक्याची भावना असते. पुण्यामध्ये कोणतेही शासकीय काम, योजना झपाट्याने राबविल्या जातात. त्यामुळे राव यांच्याप्रमाणेच मलादेखील सहकार्य करावे, असे आवाहन राम यांनी या वेळी अधिकार्यांना केले.
यापुर्वी चांगले काम केले आहे
राम म्हणाले, पुण्यात येण्याआधी विदर्भ, मराठवाड्यात काम केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि बीडमध्ये तीन वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेवर चांगले काम करण्याची संधी मिळाली. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्याला पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत लाभ दिला. त्यानंतर औरंगाबाद येथे एक वर्ष जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गासाठी केवळ सहा महिन्यांत नऊशे हेक्टर म्हणजेच 70 टक्के जमिनीचे संपादन करण्यात आले असून, जमिनी स्थानिकांनी स्वखुशीने दिल्या आहेत.