कामगारांच्या मृत्यूप्रकरणी तीन संचालकांना कोठडी

जळगाव – अयोध्यानगर परिसरातील जुन्या औद्योगिक वसाहतीमधील समृद्धी केमिकल्स कंपनीतील तीन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी कंपनीच्या तीन मालकांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 18 मेपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकीत कंपनीच्या दोघा कामगारांसह ठेकेदाराच्या बुडून झालेल्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात कंपनीचे मालक सुबोध चौधरी, सुनील चौधरी व सुयोग चौधरी या तिघांना आज सोमवारी जिल्हा न्यायालयाने 18 मे पर्यंत एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
समृद्धी केमिकल्स या कंपनीत सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकी स्वच्छ करीत असताना त्यात रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (वय 32, रा. चिंचोली, ता.यावल), मयूर विजय सोनार (वय 35, रा. कांचननगर) व दिलीप अर्जुन सोनार (वय 54, रा. कांचननगर, मूळ रा. खिरोदा, ता.रावेर) या तिघं कामगारांचा 15 मे रोजी दुपारी साडेबारा वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी इतर कर्मचार्‍यांचे जाबजबाब नोंदविले आहे. केमिकलयुक्त सांडपाणी असलेल्या टाकीत विषारी वायू तयार होतो, हे माहित असताना देखील कंपनीच्या मालकांनी सुरक्षेबाबत उपाययोजना न करता, तसेच टाकी स्वच्छ करणार्‍या कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही खास कपडे किंवा साहित्य न देता टाकीत उतरविले. या टाकीत बुडून तिघं कामगारांचा मृत्यू झाला, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन कंपनीचे संचालक सुबोध सुधाकर चौधरी, हिरा सुबोध चौधरी, अपर्णा सुयोग चौधरी, सुुनील सुधाकर चौधरी, सुयोग सुधाकर चौधरी (सर्व रा. सागर नगर, एमआयडीसी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात पोलिसांनी सुबोध चौधरी, सुनील चौधरी व सुयोग चौधरी यांना रविवारी अटक केली. यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.