कामगाराचा डक्टमध्ये पडून मृत्यू

0

वाकड : चालू बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने लिफ्टच्या डक्टमध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीपकुमार श्रीचंदर प्रजापती असे लिफ्टच्या डक्टमध्ये पडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

याबाबत मयत कामगाराचा भाऊ संदीपकुमार प्रजापती (वय 19, रा. खैराटी, उत्तर प्रदेश) याने वाकड पोलिस ठाण्यात ठेकेदार रणवीर सिंग व अन्य जबाबदार इसमांविरुद्ध फिर्याद दिली आहे. कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचे वेस्टर्न अ‍ॅव्हेन्यू साईट एच बिल्डिंग येथे बांधकाम साईटचे काम सुरु आहे. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास मयत प्रदीपकुमार प्रजापती हा फरशी बसविण्याचे काम करीत होता. फरशी घेण्यासाठी तो लिफ्टजवळ गेला असता तोल जाऊन लिफ्टच्या डक्टमध्ये पडून गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कामगारांना सेफ्टी बेल्ट व सेफ्टी नेट न पुरवता निष्काळजीपणा केल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाला. याबाबत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.