पुणे । महापालिका कामगार कल्याण निधीतर्फे सभासद सेवकांच्या ज्या पाल्यांनी यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेमध्ये 65 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले अशा पाल्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी दहावीमधील 108 व बारावीमधील 39 सभासद सेवकांच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, सह पालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर आदी उपस्थित होते.
धर्माधिकारी म्हणाले, भविष्यकालीन वाटचालीसाठी वेळेचे नियोजन करणे ही बाब अत्यावश्यक असून, त्यामुळे कोणतेही साध्य सहज साध्य करता येते. गुण मिळविणे महत्त्वाचे नसून त्यामध्ये पारंगत असणे आवश्यक आहे. प्रत्येकाला शिक्षणाविषयी तरणोपाय नाही. शिक्षणामुळे आपले व्यक्तिमत्त्व घडते. परिस्थितीवर मात करत येते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्त्व देणे गरजेचे आहे. कोणत्याही क्षेत्रात या प्राप्तीबाबतच आपल्या अंगी नम्रता असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे करमरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सत्कारार्थी विद्यार्थ्यांना हॅवर सॅक व कॅलक्युलेटर बक्षिस दिले. यावेळी कु. सुरभी पाटील हिने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अलका जोशी यांनी तर नितीन केंजळे यांनी आभार मानले.