जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा गैरफायदा घेत केंद्र सरकारने व अनेक राज्यातील सरकारांनी कामाचे तास 8 वरून 12 करणे, कामगार कायद्यांना
स्थगिती देणे, कामगार कायद्यात मालक धार्जिणे बदल करणे अशाप्रकारे कामगारांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र रचले जात आहे. याविरोधात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सर्व केंद्रीय श्रमिक संघटनांच्या वतीने 22 मे रोजी देशभरात काळी फीत लावून कामगार विरोधी धोरणाचा निषेध दिन पाळण्यात आला. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या वतीने नवीन बसस्थानक येथे काळी फीत लाऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे राज्य उपाध्यक्ष नरेंद्रसिंह राजपूत , राज्य मिडिया प्रमुख संदीप सुर्यवंशी , जळगाव विभा.खजिनदार दिनेश महाशब्दे जळगाव डेपो अध्यक्ष मनोहर मिस्तरी सचिव रविंद्र पाटील , राजेश पाटील , आर.बी.शिंपी , बळीराम सावंत , पी.एस.चव्हाण यांचेसह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
अशा आहेत प्रमुख मागण्या
केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कामगार कायदे स्थगित करण्याचे तसेच कामगार कायदे बदलण्याचा निर्णय रद्द करावेत, कामाचे तास 12 वरून पूर्वीप्रमाणे 8 तास करावेत, लॉकडाऊन कालावधीचे संपूर्ण वेतन कामगारांना अदा करण्यात यावे., लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगार व नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची पुरेशी व्यवस्था करावी, त्यांना अन्न, पाणी व औषधोपचाराची व्यवस्था करावी, आयकर लागू नसलेल्या प्रत्येक कुटूंबाला मासिक 7500 रुपये थेट मदत करावी, सर्व गरजुंना रेशन दुकानातून स्वस्त अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा., सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी जीडीपीच्या 5 टक्के खर्च करण्यात यावा, कोरोना (कोव्हीड-19) या महामारीत कंत्राटी कामगारांना आवश्यक ती सुरक्षा साधने व अतिरिक्त दैनंदिन भत्ता, मासिक प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा या प्रमुख मागण्या आहेत.