आळंदी : देशात कामगार, शेतकरी आणि काँग्रेस एकत्र येण्याची गरज आहे. यामुळे देशात खर्या अर्थाने सर्वांना चांगले दिवस येतील. लोकसभेच्या 2014 साली झालेल्या निवडणुकीत केलेली चूक सन 2019 च्या निवडणुकीत सुधारण्याची संधी आहे. या संधीचे सोने करण्याचे आवाहन सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज कॉन्फेडरेशन व नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ सेंट्रल गर्व्हनमेंट एम्प्लॉईज न्यू दिल्ली यांचे खुल्या अधिवेशनात कार्याध्यक्ष अशोक सिंग यांनी केले. त्रैवार्षिक सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज कॉन्फेडरेशन व नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज न्यू दिल्ली यांची द्विवार्षिक सभा येथील रसिकलाल धारिवाल सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी सिंग बोलत होते. या सभेस विविध राज्यातून विविध शासकीय कामगार संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. 2019 ते 2021 या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ.एम.राघवैय्या, कार्याध्यक्षपदी अशोक सिंग, सचिवपदी एन.एस.पिल्ले, पृथ्वीराज बावीकर, प्रशांत ठाकरे, महेशकुमार शर्मा, रवींद्र कांबळे यांच्यासह विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधींचा समावेश करीत राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष कामगार नेते कैलास कदम, उमाकांत वालगुडे, कादर शेख आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
न्याय हक्कांसाठी लढा देणार
या अधिवेशनात कामगारांना वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्याक्ष आर श्रीनिवासन, पृथ्वीराज बावीकर, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अशोक सिंह, राष्ट्रीय सचिव एन.एस.पिल्ले, कैलास कदम आदींनी मार्गदर्शन केले. यात संघटित, असंघटित व रोजंदारीवरील कामगारांचे न्याय हक्कांसाठी लढा तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अधिवेशनात वक्त्यांनी देशातील सरकारचे धोरणावर संतप्त टीका केली. देशातील विविध शासकीय खात्यातील असंघटित रोजंदारी वरील कामगारांचे न्याय हक्कासाठी राष्ट्रीय कॉन्टीजेसी पेड वर्कर्स युनियनची स्थापना करीत आळंदीत घोषणा करण्यात आली. या अधिवेशनात देशातील असंघटित रोजंदारीवरील कामगारांसाठी राष्ट्रीय कॉन्टीजेसी पेड वर्कर्स युनियनची स्थापना करीत असल्याची घोषणा सचिव एन.एस.पिल्ले यांनी केली. रवींद्र कांबळे यांची जनरल सेक्रटरी पदी नियुक्ती करण्यात आली. शासकीय खात्यातील तसेच खाजगी कारखान्यातील असंघटित रोजंदारीवरील कामगारांना समान काम समान वेतन तसेच खात्यात कायम स्वरूपी कामावर ठेवण्याचे मागणीसाठी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी रवींद्र कांबळे यांनी दिला.