भुवनेश्वर । भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे, असे मत हॉकी विश्व लीगमध्ये कांस्यपदक पटकावणार्या भारतीय संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी व्यक्त केले. साखळी फेरीत एकही सामना न जिंकणार्या भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत तगड्या बेल्जियम संघाचा सडन डेथमध्ये पराभव केला होता. त्यानंतर सेमीफायनलमध्ये मात्र ते अर्जेंटिनाकडून एका गोलने पराभूत झाले. त्यानंतर कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात 11 खेळाडूंसह उतरलेल्या जर्मनीचा भारताने पराभव केला. भारतीय संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन म्हणाले की मी प्रदशर्नावर खूश आहे; पण कामगिरीत सातत्य गरजेचे वाटते. या संघासोबत मी आशिया चषकात होतो. मोठ्या पातळीवरची ही माझी पहिलीच स्पर्धा होती. संघाच्या मजबूत आणि कमकुवत बाजूंची कल्पना आली आहे.
संघाच्या कामगिरीचा अभिमान
मी प्रत्येकवेळी संघाबाबत बोलतो. वैयक्तिक कामगिरीबाबत नाही, असेही भारतीय संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी स्पष्ट केले. आम्ही जगातील कोणत्याही संघाविरुद्ध खेळू शकतो आणि खेळाडूंचाच विश्वास आहे की ते कोणत्याही संघाला हरवू शकतात. हे चांगले संकेत आहेत. भारतीय संघात 7 ज्युनियर खेळाडू आहेत, ज्यांनी अव्वल संघांविरुद्ध खेळ केला. अशा संघाने कांस्यपदक जिंकून दिले यावर अभिमान असायला हवा, हेही मारिन यांनी नमूद केले.